भुसावळ (प्रतिनिधी) : सध्याच्या धावपळीच्या आणि स्वार्थी वातावरणात प्रामाणिकपणाचे दर्शन दुर्मिळ होत चालले असताना, भुसावळातील एका शाळेत इयत्ता आठवीत शिकणाऱ्या चिमुकलीने आपल्या कृतीतून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. विकास कॉलनी परिसरातील रहिवासी रिद्धी नरेंद्र सरोदे हिने स्विमिंग पूलमध्ये सापडलेली तब्बल ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन प्रामाणिकपणे मूळ मालकाला परत करून सर्वांचे मन जिंकले आहे. तिच्या या कृतीचे शहरभरातून कौतुक होत आहे.

पाण्यात चमकली सोनसाखळी अन्…
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे भुसावळ शहरातील जळगाव रोडलगत असलेल्या ‘वसंत विहार’ येथील ‘जी.डी. स्पोर्ट्स’च्या स्विमिंग पूलमध्ये नागरिकांसह बच्चेकंपनीची मोठी गर्दी होत आहे. याच ठिकाणी नरवीर सिंग रावळ हे पोहण्यासाठी आले असता त्यांच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन पाण्यात निखळून पडली. मात्र, पोहण्यात व्यस्त असल्याने त्यांना ही बाब लक्षात आली नाही.
दरम्यान, पोहत असलेल्या रिद्धी सरोदे हिची नजर पाण्याच्या तळाशी चमकणाऱ्या त्या चैनवर पडली. क्षणाचाही विलंब न करता तिने ती चैन बाहेर काढली. मात्र, ती स्वतःकडे न ठेवता तिने तत्काळ स्विमिंग पूल परिसरातील लोकांकडे विचारपूस केली.
कोचकडे जमा केली चैन
चैनचा मालक कोण हे समजून न आल्याने रिद्धीने ती चैन स्विमिंग कोच अक्षय कोळी यांच्या स्वाधीन केली. कोच कोळी यांनीही तत्परता दाखवत ती चैन कार्यालयात सुरक्षित जमा केली.
दुसरीकडे, घरी गेल्यानंतर रात्री नरवीर सिंग रावळ यांच्या लक्षात चैन हरवल्याचे आले. त्यांनी तातडीने स्विमिंग पूल प्रशासनाशी संपर्क साधून चौकशी केली. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. पूर्ण खात्री झाल्यानंतरच संबंधित सोन्याची चैन रावळ यांच्या स्वाधीन करण्यात आली.
बक्षीस नाकारले; प्रेमाखातर स्वीकारले
रिद्धीच्या प्रामाणिकपणाने भारावून गेलेल्या नरवीर सिंग रावळ यांनी तिला रोख बक्षीस देण्याचा प्रयत्न केला. मात्र, “प्रामाणिकपणा हे माझे कर्तव्य होते,” असे सांगत रिद्धीने ते बक्षीस नम्रपणे नाकारले. अखेर रावळ यांनी प्रेमाग्रहाने तिला ते स्वीकारण्यास भाग पाडले.
समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण
उन्हाळ्याच्या दिवसांत गर्दीचा फायदा घेत मोबाईल, पैसे आणि मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, रिद्धीने सोन्या पेक्षाही लाख मोलाचा दाखवलेला ‘सुवर्ण ‘प्रामाणिकपणा समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
या गौरवास्पद कृतीबद्दल स्विमिंग पूलचे संचालक देविदास पाटील, नरेंद्र सरोदे, स्वप्निल पाटील, सुधीर पाटील आदी मान्यवरांनी रिद्धीचा विशेष सन्मान केला. एका सामान्य कुटुंबातील या चिमुकलीने दाखवलेल्या असामान्य प्रामाणिकपणाची चर्चा सध्या संपूर्ण भुसावळ शहरात अभिमानाने होत आहे.


