म्हसावद हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; ५६ लाखांची अवैध दारू जप्त

भुसावळ (प्रतिनिधी)- शहादा तालुक्यातील म्हसावद पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने अवैध दारूविरोधात मोठी कारवाई करत तब्बल ५६ लाख ४४ हजार ४८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना २१ मे २०२६ रोजी गुप्त माहिती मिळाली होती की, म्हसावद हद्दीतील तोरणमाळ रोडवरून एका पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनातून मोठ्या प्रमाणावर अवैध दारूची वाहतूक केली जाणार आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ पथक तयार करून म्हसावद ते तोरणमाळ रस्त्यावरील राणीपूर दशामाता मंदिर परिसरात सापळा रचला.

रात्री सुमारे ८.२० वाजेच्या दरम्यान संशयित पिकअप वाहन (एमएच १५ एचएच ८२७६) घटनास्थळी येताना दिसले. पोलिसांचे पथक पाहताच चालक व क्लीनर यांनी वाहन रस्त्यावर सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध दारूचा साठा आढळून आला. या कारवाईत वाहनासह २६ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दरम्यान तपासात मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, हा दारू साठा म्हसावद येथील सत्तार ठाकरे याचा असल्याचे समोर आले. तसेच त्याने घराजवळील एका खोलीत आणखी दारू लपवून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अनकवाडे, ता. शहादा येथील त्याच्या घरावर छापा टाकला. घर बंद अवस्थेत असले तरी झडतीदरम्यान तेथून २९ लाख ६४ हजार ४८० रुपये किमतीचा अवैध दारू साठा जप्त करण्यात आला. घटनास्थळावरून एका व्यक्तीचे आधारकार्डही पोलिसांच्या हाती लागले.

या संपूर्ण कारवाईत एकूण ५६ लाख ४४ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी म्हसावद पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ)(ई), १०८, ८१ अन्वये गुन्हा क्रमांक १९३/२०२६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ तसेच पोलीस कर्मचारी जितेंद्र पाडवी, दादाभाऊ वाघ, सजन वाघ, ज्ञानेश्वर पाटील, मोहन ढमढेरे, सुनील येलवे, सचिन वसावे, पुरुषोत्तम सोनार, यशोदीप ओगले आणि राजेंद्र काटके यांच्या पथकाने पार पाडली.