भुसावळ (प्रतिनिधी) – तालुक्यातील सुनसगावजवळील गोजोरे येथे दि. २२ रोजी पशुपालन व कुक्कुटपालन या विषयांवर प्रात्यक्षिक व समूह चर्चेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात शेतकरी व पशुपालकांना पशुपालन व्यवस्थापनासाठी उपयुक्त विविध मोबाईल ॲप्सची माहिती देण्यात आली.

या वेळी पशुसंवर्धन, आरोग्य व्यवस्थापन, लसीकरण, खाद्य व्यवस्थापन तसेच बाजारभावाची माहिती मोबाईल ॲप्सच्या माध्यमातून कशी मिळविता येते, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सुधारित कोंबडीपालनाच्या विविध प्रजाती, त्यांचे संगोपन, खाद्य व्यवस्थापन, लसीकरण, निवास व्यवस्था आणि व्यवसायातील आर्थिक फायदे याविषयी उपस्थितांना सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमा दरम्यान शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले. सुधारित कुक्कुटपालन व्यवसाय ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त उत्पन्नाचे प्रभावी साधन ठरू शकते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमास गावातील शेतकरी, पशुपालक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा उपक्रम सहयोगी अधिष्ठाता डॉ. संदीप पाटील तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. सागर बंड आणि डॉ. प्रीती दातीर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
या उपक्रमात महाविद्यालयाच्या समृद्धी पालवे, मानसी देसाई, प्रिती शिंदे, स्नेहल माने व सुचिता पाटील या पाच विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग नोंदवला. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना ग्रामीण भागातील प्रत्यक्ष अनुभव मिळत असून शेतकरी व विद्यार्थिनी यांच्यात ज्ञानाची देवाणघेवाण होत असल्याचे सांगण्यात आले.


