भुसावळमध्ये विनापरवाना वृक्षतोड; आदर्श शाळेबाहेरील तीन मोठी झाडे तोडल्याने संताप ;

भुसावळ (प्रतिनिधी)- : शहरात एकीकडे पर्यावरण संवर्धनासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू असताना, दुसरीकडे आदर्श शाळेबाहेर असलेल्या तीन मोठ्या वृक्षांची विनापरवाना कत्तल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या वृक्षतोडीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, पर्यावरणप्रेमींनी प्रशासनाला धारेवर धरले आहे.

आदर्श शाळेबाहेरील झाडे तोडली जात असल्याचे निदर्शनास येताच सजग नागरिकांनी तात्काळ ‘पर्यावरण संवर्धन व विकास समिती’चे जिल्हाध्यक्ष देवेंद्र वराडे (अप्पा) आणि तालुकाध्यक्ष पवन नाले यांना माहिती दिली. माहिती मिळताच समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली.

या गंभीर प्रकाराबाबत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिका अधिकारी धनराज बाविस्कर यांच्याशी संपर्क साधून “आदर्श शाळेला वृक्षतोडीसाठी पालिकेची परवानगी देण्यात आली आहे का?” असा सवाल उपस्थित केला. यावर बाविस्कर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “नगरपालिकेकडून शहरात कोणालाही वृक्षतोडीसाठी कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही.”

पालिकेची परवानगी नसताना भरदिवसा वृक्षतोड कशी झाली? आणि यामागे कोणाचा वरदहस्त आहे? असा संतप्त सवाल देवेंद्र वराडे, पवन नाले तसेच उपस्थित नागरिकांनी उपस्थित केला आहे. विनापरवाना झाडे तोडणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

दरम्यान, या वृक्षतोडीमुळे शहराच्या हरित पट्ट्याचे मोठे नुकसान झाले असून, संबंधितांवर तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पर्यावरणप्रेमींनी दिला आहे.