भुसावळ शहरातील देना नगर येथे उघड्या ट्रान्सफॉर्मरमुळे अपघाताची शक्यता.

भुसावळ (प्रतिनिधी)-

भुसावळ शहरातील देना नगर परिसरातील गणपती मंदीरा परिसरातील वीज ट्रान्सफॉर्मर उघड्या अवस्थेत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर ट्रान्सफॉर्मरला दरवाजा नसल्याने त्यामधील तारा, फ्यूज व इतर विद्युत यंत्रणा स्पष्टपणे दिसत आहेत, ज्यामुळे कोणत्याही क्षणी गंभीर अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विशेष बाब म्हणजे हा ट्रान्सफॉर्मर गणपती मंदीर परिसराला लागून असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तसेच ट्रान्सफॉर्मरच्या आजू बाजूने घर देखील असून कुटुंबात लहान मुले पण वास्तव्यास आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, ट्रान्सफॉर्मरभोवती आवश्यक सुरक्षा व्यवस्था नसल्याने लहान मुले, नागरिक आणि परिसरातील
रहिवाशांना मोठा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः उघड्या अवस्थेत असलेल्या विद्युत ताराआणि फ्यूजमुळे कोणतीही दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी संबंधित वीज विभाग व प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन ट्रान्सफॉर्मरला सुरक्षित दरवाजा बसवावा, आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात आणि परिसरातील नागरिकांच्या जीविताची सुरक्षा सुनिश्चित करावी, अशी मागणी केली आहे. वेळेत कारवाईन झाल्यास एखादी मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.