जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भुसावळ विभागात जनजागृती रॅली व कार्यशाळा संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी) : जागतिक पर्यावरण दिन 2026 निमित्त 20 मे रोजी भुसावळ विभागातील विविध रेल्वे स्थानके, रेल्वे वसाहती तसेच कार्यालयीन परिसरांमध्ये स्वच्छता व पर्यावरण संरक्षणाबाबत विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत विभागातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर विशेष जनजागृती अभियान राबविण्यात आले. प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना प्लॅटफॉर्मवरील कचरा वर्गीकरण (Waste Segregation) याचे महत्त्व पटवून देण्यात आले. कचरापेट्यांचा योग्य वापर, जैविक व पर्यावरणपूरक कटलरीचा वापर वाढविणे, सिंगल यूज प्लास्टिकचा वापर कमी करणे तसेच जैविक कचऱ्याचे सुरक्षित व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

रेल्वे कर्मचाऱ्यांनाही स्वच्छता मानकांचे पालन, योग्य कचरा वर्गीकरण आणि पर्यावरण संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत संवेदनशील करण्यात आले.

यावेळी विभागातील विविध रेल्वे स्थानके आणि रेल्वे वसाहतींमध्ये व्यापक स्तरावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांच्या सक्रिय सहभागातून स्वच्छता उपक्रम यशस्वीरीत्या पार पडले. या माध्यमातून स्वच्छ व हरित पर्यावरणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना पर्यावरण संरक्षण, स्वच्छतेचा अंगीकार आणि अधिकाधिक वृक्षारोपण करण्याचे आवाहन करण्यात आले.

भुसावळ मंडळामार्फत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आगामी काळातही विविध जनजागृती कार्यक्रम, स्वच्छता मोहिमा आणि लोकसहभागावर आधारित उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.