भुसावळच्या धन्वी चौधरीचा राज्यात प्रथम क्रमांक; ‘अकादमी उत्कृष्टता पुरस्कार’ाने गौरव

भुसावळ (प्रतिनिधी) : येथील डॉ. उल्हास पाटील शाळेची विद्यार्थिनी धन्वी गोपाळ चौधरी हिने आपल्या उज्ज्वल यशाने भुसावळच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढवला आहे. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते तिला ‘अकादमी उत्कृष्टता पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

मुंबईस्थित डॉ. होमी भाभा फाउंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या ‘यंग सायंटिस्ट’ परीक्षेत इयत्ता आठवीच्या गटातून राज्यभरातील तब्बल २४ हजार विद्यार्थ्यांमध्ये धन्वीने प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले. तिच्या या दैदिप्यमान कामगिरीमुळे शाळेसह संपूर्ण परिसरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे

धन्वीच्या गुणवत्तेची दखल घेत संस्थेमार्फत तिला इस्रो भेटीची विशेष संधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. धन्वी ही पिंप्रीसेकम येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक गोपाळ चौधरी आणि सुरवाडे येथील शिक्षिका रुपाली चौधरी यांची कन्या आहे. तिच्या यशामुळे पालक, शिक्षक व भुसावळकरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.