भुसावळात गावठी पिस्टलसह तरुण जेरबंद; ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त: बाजारपेठ डी.बी. पथकाची कारवाई:

भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील शिरपूर-कन्हाळा रोडवरील घोडेपिर बाबा दर्गा परिसरात गावठी पिस्टल व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणास भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या डी.बी. पथकाने जेरबंद केले. आरोपीकडून ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोघांविरुद्ध आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलिस अधीक्षक संदीप गावित तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी केदार बारबोले यांनी भुसावळ शहरात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने ही कारवाई केली.

डी.बी. पथकातील पोलिस हेड कॉन्स्टेबल विजय नेरकर, कांतीलाल केदारे व इतर कर्मचाऱ्यांना गुप्त माहिती मिळाली होती की, घोडेपिर बाबा दर्गा परिसरात एक तरुण गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा व जिवंत काडतूस घेऊन येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित अरसद अली शेख खालिद अली (वय २०, रा. आझाद नगर, बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) याला ताब्यात घेतले.

त्याच्या अंगझडतीत ४० हजार रुपये किमतीचे मॅगझीनसह लोखंडी गावठी पिस्टल व एक हजार रुपये किमतीचे जिवंत काडतूस असा एकूण ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. चौकशीत सदर कट्टा मोहम्मद राजीक मोहम्मद आरिफ (वय १९, रा. मुस्लिम कॉलनी, भुसावळ) याने ठेवण्यासाठी दिल्याची कबुली आरोपीने दिली.

याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २३६/२०२६ अन्वये आर्म अॅक्ट कलम ३/२५ तसेच महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७(१), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल कांतीलाल केदारे करीत आहेत.