बुलढाणा (प्रतिनिधी) –
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील वरदडी बुद्रुक येथे एका लग्नसोहळ्यात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. मुलीचे कन्यादान करत असतानाच वधूपित्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने आनंदाचे वातावरण क्षणात शोकात बदलले. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हळहळला आहे.

कुरूमदास पुंडलिक भुतेकर (वय ५०) असे मृत वधूपित्याचे नाव आहे. त्यांची कन्या नंदिनी हिचा विवाह जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील आर्डा (तोलाजी) येथील प्रदीप महादेव नानोटे यांच्यासोबत मोठ्या उत्साहात पार पडत होता. लग्नमंडपात सनई-चौघड्यांचे सूर, मंगलाष्टकांचा गजर आणि नातेवाईकांची गर्दी यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
मुलीच्या लग्नासाठी कुरूमदास भुतेकर हे अनेक दिवसांपासून धावपळ आणि तयारी करत होते. नातेवाईकांना स्वतः जाऊन निमंत्रण देत त्यांनी मुलीचा विवाह संस्मरणीय करण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते.
मात्र मंगळवारी सायंकाळी वधूची पाठवणी होण्यापूर्वी कन्यादान विधी सुरू असताना अचानक त्यांच्या छातीत तीव्र वेदना जाणवल्या आणि ते जागीच कोसळले. उपस्थितांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली, मात्र हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेने लग्नमंडपात एकच शोककळा पसरली.
माहितीनुसार, चार महिन्यांपूर्वीच त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यापूर्वी डिसेंबर महिन्यात त्यांच्या आईचे निधन झाले होते. तसेच २१ एप्रिल रोजी मुलाचा विवाह पार पडला होता. अवघ्या काही दिवसांत मुलीच्या लग्नावेळी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे भुतेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कुरूमदास भुतेकर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे आणि दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.


