१४ वर्षांनंतर पुन्हा ‘निर्भया’ची आठवण; राजधानीत संतापाची लाट

दिल्ली ( प्रतिनिधी )-
राजधानी दिल्ली पुन्हा एकदा निर्भयाकांडासारख्या संतापजनक घटनेने हादरली आहे. दिल्लीतील राणीबाग परिसरात धावत्या स्लीपर बसमध्ये एका ३० वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण दिल्लीमध्ये संताप व्यक्त केला जात असून पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता मंगळवारी रात्री उशिरा कामावरून घरी परतत होती. यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका तरुणाला वेळ विचारण्यासाठी ती थांबली. मात्र, त्या तरुणाने महिलेला जबरदस्तीने एका स्लीपर बसमध्ये ओढले. बसमध्ये आधीच काही आरोपी उपस्थित होते. त्यानंतर बस सुरू करून आरोपींनी चालत्या बसमध्ये जवळपास दोन तास महिलेवर पाशवी अत्याचार केल्याचा आरोप आहे.
अत्याचारानंतर आरोपींनी पीडितेला सुमारे सात किलोमीटर अंतरावर रस्त्यावर फेकून दिले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ संबंधित बसचा शोध घेत ती जप्त केली. घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात आले असून बस त्या रात्री कोणत्या मार्गाने फिरली याचा तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही पोलिसांकडून तपासणी केली जात आहे.
आरोपींच्या शोधासाठी अनेक पथके तैनात
पोलिसांनी सांगितले की, आरोपींची ओळख पटवण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, बसचा मार्ग आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात असून लवकरच त्यांना अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
कुटुंबाची जबाबदारी असल्याने उपचारास नकार
पीडिता ही पीतमपुरा येथील झोपडपट्टी भागात वास्तव्यास असून मंगोलपुरीतील एका कारखान्यात काम करते. तिचा पती आजारी असून घराची संपूर्ण जबाबदारी तिच्यावर असल्याची माहिती तिने पोलिसांना दिली. तिला तीन लहान मुली असून आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने तिने रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला. “काम बंद केले तर घर चालवणे कठीण होईल,” असे तिने पोलिस तपासात सांगितले.


