भुसावळ (प्रतिनिधी) – तालुक्यातील सुनसगाव
येथून जवळच असलेल्या गोजोरे गावात गुरुवारी (दि. १४ मे २०२६) संत मुक्ताई शासकीय कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगर येथील RAWE (Rural Agricultural Work Experience) कार्यक्रमांतर्गत कृषिकन्यांचे उत्साहात आगमन झाले. ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत करत उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी समृद्धी पालवे, मानसी देसाई, प्रिती शिंदे, स्नेहल माने व सुचिता पाटील या कृषिकन्या गावात दाखल झाल्या. गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी त्यांचे आत्मीयतेने स्वागत केले.
हा उपक्रम सहयोगी अधिष्ठाता डॉ. संदीप पाटील तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. सागर बंड व डॉ. प्रीती दातीर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.
यावेळी कृषिकन्यांनी गावातील शेतकरी गट व ग्रामस्थांशी संवाद साधत शेती पद्धती, प्रमुख पिके, पाणी व्यवस्थापन, शेतकऱ्यांच्या अडचणी तसेच ग्रामीण विकासासंदर्भातील माहिती जाणून घेतली. ग्रामस्थांनीही आपल्या समस्या, अनुभव व अपेक्षा कृषिकन्यांसमोर मांडल्या.
RAWE कार्यक्रमाच्या माध्यमातून कृषिकन्या गावातील शेती पद्धती, पीक व्यवस्थापन, ग्रामीण जीवन तसेच विविध कृषी उपक्रमांचा प्रत्यक्ष अभ्यास करणार आहेत. तसेच शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, पीक संरक्षण, सेंद्रिय शेती व विविध शासकीय कृषी योजनांविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना ग्रामीण भागातील प्रत्यक्ष अनुभव मिळणार असून शेतकरी व कृषिकन्या यांच्यात ज्ञानाची प्रभावी देवाणघेवाण होणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.


