भुसावळ (प्रतिनिधी) - मराठा साम्राज्याचे दुसरे सेनापती छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला . ते अवघ्या दोन वर्षाचे असतानाच त्यांच्या मातोश्री सईबाई यांचे निधन झाले . त्यांचा सांभाळ व संगोपन आजी जिजाबाई यांनीच केले . जिजाबाईंनी एकाच वेळेस मुलगा शिवाजी व नातू संभाजी यांना राज्यकारभाराचे धडे दिले .
छत्रपती शिवाजी महाराज यांचे निधन दिनांक ३ एप्रिल १६८० ला झाले तेंव्हा मराठा साम्राज्याचा राज्यकारभार त्यांच्याकडं येणे क्रमप्राप्त होते , मात्र त्यांच्या सावत्र आई सोयराबाई यांनी त्यांचा मुलगा राजाराम यांना तडकाफडकी शिवाजी महाराजांचे वारस म्हणून जाहीर करून त्यांचा मंचका रोहण करवून घेतले व पन्हाळगडावर असलेल्या संभाजी महाराजांना पकडुन आणण्या करिता हंबिरराव मोहिते , प्रल्हाद निराजी यांना पाठविले . पन्हाळगडावर गेल्यानंतर मात्र हे दोघं संभाजी महाराजांना शरण गेले व घडला प्रकार सांगितला .
वडील शिवाजी महाराजांचे निधन व सोयराबाईंनी खेळलेली खेळी लक्षात घेता त्यांनी हिरोजी फर्जंद , जनार्दन हणमंते , मोरोपंत पिंगळे , अण्णाजी दाते , बाळाजी आवजी यांना अटक करवली व १६ जानेवारी १६८१ ला स्वतःचा मंचका रोहण केला . त्या नंतर हिरोजी फर्जंद , बाळाजी आवजी, अण्णाजी दत्तो , सोमजी दत्तो आदींना हत्तीच्या पायदळी तुडवले. संभाजी महाराजांची पूर्ण हयात औरंगजेब विरुध्द लढण्यात खर्ची गेली . राजाच्या अंगी असणारे सर्व गुण जसे करारीपणा , शौर्य , धैर्य , धडाडी , दूरदृष्टी , जनते विषयी प्रेम वगैरे संभाजी महाराजांमध्ये होते . त्यांनी तब्बल १२० लढाया मोगल , पोर्तुगाल , सिद्दी , इंग्रज यांच्या विरुध्द अगदी एकाकी स्वरूपाच्या लढल्या . त्यांच्या या शौर्याचे कौतुक करतांना काही इतिहासकारांनी त्यांना ' सवाई शिवाजी ' म्हणून संबोधले आहे . ते राजे होते , उत्तम प्रशासक होते , शुर होते , धाडसी, पराक्रमी होते , याच बरोबर ते प्रचंड अभ्यासू , लेखक , विविध भाषांचे जाणकार होते .
संभाजी महाराज संस्कृत भाषेचे मोठे अभ्यासक होते . त्यांनी वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी ' बुध भूषण ' हा ग्रंथ संस्कृत भाषेत लिहिला . हा ग्रंथ लिहितांना त्यांनी विविध प्राचीन ग्रंथांचा अभ्यास केला असल्याचे दिसून येते . त्यांनी एका ग्रंथात जवळ जवळ ८९ विषयांवर विचार व्यक्त केले आहेत . यातील काही विषयावर त्यांनी पक्षी , वृक्ष यांची उदाहरणे देऊन व्यंग तयार केले आहे . त्यांनी या ग्रंथात काव्यालंकार , शास्त्रे , संगीत , पुराणे , धनुर्विद्या आदींचा अभ्यास केला असल्याचे नमूद केले आहे . या वरून ते केवळ लढाया लढण्या पुरते राजे नव्हते हे दिसून येते . त्यांनी जातीय , धार्मिक द्वेष निर्माण केल्याचे कोठेही दिसत नाही . त्यांनी या ग्रंथात राजा, राजाचे गुण , राजाचे मदतनीस , राजाचे सल्लागार , राजाची कर्तव्ये , कोश, दुर्ग , सैन्य , हेर , नोकर आदींची माहिती दिली आहे या लिखाणावरून असे दिसते की त्यांनी एक प्रकारे ' राजसंहीता ' निर्माण केली .
संभाजी महाराजांनी केवळ हाच ग्रंथ लिहिला नाही तर , नायिका भेद ( काव्यसंग्रह ) , नखशिख( सौंदर्य वर्णन) , सात सजक ( निती शास्त्र ) सारखी काही ग्रंथ तर समयतय ही पोथी सुद्धा लिहिली आहे . ते महाराष्ट्रीयन पण उत्तर प्रदेश , राजस्थान , हरियाणा मधील ग्रामीण भागात बोलली जाणारी ब्रज भाषा त्यांना अतिशय प्रिय होती . ब्रज भाषेत त्यांनी तीन ग्रंथ लिहिले आहेत . इंग्रजी भाषेवर सुद्धा त्यांचे प्रभुत्व होते .
अत्यंत स्वाभिमानी असणाऱ्या संभाजी महाराजांची आज (१४ मे ) जयंती त्या निम्मित त्यांना विनम्र अभिवादन .
लेखक …… जयसिंग वाघ , जळगाव
संपर्क ….. ९८८१९२८८८१



