जागतिक परिचारिका दिनानिमित्त भुसावळात परिचारिकांचा सन्मान ; प्रतिष्ठा महिला मंडळाचा उपक्रम; नगरपालिका दवाखान्यात उत्साहात सत्कार सोहळा

भुसावळ (प्रतिनिधी)-

येथील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे जागतिक परिचारिका दिनानिमित्त भुसावळ नगरपालिका दवाखाना येथे परिचारिकांचा विशेष सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. समाजाच्या आरोग्य सेवेमध्ये परिचारिकांचे योगदान अत्यंत मोलाचे असून रुग्णांची सेवा, काळजी आणि समर्पण भावनेने त्या अहोरात्र कार्यरत असतात. त्यांच्या या निस्वार्थ सेवेला मानवंदना देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमास प्रभारी नगराध्यक्ष सौ. शैलजा नारखेडे, आरोग्य सभापती मेघा वाणी, डॉ. कीर्ती फलटणकर, डॉ. जैन तसेच नगरसेविका सोनल महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते परिचारिकांना हळदी-कुंकू, ओटी व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांनी, “कोरोनासारख्या कठीण काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता परिचारिकांनी दिलेली सेवा समाज कधीही विसरणार नाही. त्यांच्या कार्यामुळे समाज त्यांचा सदैव ऋणी राहील,” अशा भावना व्यक्त केल्या.

प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी परिचारिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. रुग्णांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा मानून कार्य करणाऱ्या परिचारिका समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

या उपक्रमामुळे परिचारिकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला असून मिळालेल्या सन्मानामुळे त्यांचे मनोबल अधिक उंचावल्याची भावना व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या सर्व सदस्यांसह अनिता आंबेकर व वैशाली सैतवाल यांनी परिश्रम घेतले.