साकरी शिवारात अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळला

भुसावळ (प्रतिनिधी) –

तालुक्यातील साकरी शिवार परिसरात रेल्वे ट्रॅकजवळ एका अज्ञात पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील हाडांचा सांगाडा आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत साकरी येथील पोलीस पाटील रतनसिंग उत्तमसिंग बोदर (वय ५४) यांनी पोलिसांना खबर दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सुमारे ८.३० वाजता रेल्वेमध्ये ट्रॅकमन म्हणून कार्यरत असलेले आनंदा विठ्ठल तडस यांनी त्यांना माहिती दिली की, वरणगाव ते भुसावळ अप रेल्वे लाईनवरील खांब क्रमांक ४५१/१५ जवळ बुस्टर पाईपलाईन शेजारी रेल्वे

ट्रॅकच्या बाजूला असलेल्या सिमेंट काँक्रीट नालीमध्ये एका अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील सांगाडा पडलेला दिसून आला आहे. माहिती मिळताच पोलीस पाटील रतनसिंग बोदर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सदर मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असून हाडांचा सांगाडा स्पष्ट दिसत होता. संबंधित मृत व्यक्तीच्या उजव्या हाताच्या मनगटाजवळ स्टील धातूचे गोलकडे आढळून आले. मृत व्यक्ती पुरुष असून त्याचे वय अंदाजे ४० ते ५० वर्षे दरम्यान असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी मृत व्यक्तीचा सांगाडा ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ट्रॉमा केअर सेंटर, ग्रामीण रुग्णालय, भुसावळ येथे पाठविला

आहे. अद्याप मृत व्यक्तीची ओळख पटलेली नसून त्याचे नाव, गाव अथवा नातेवाईक याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. भुसावळ तालुका पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक १५/२०२६ अंतर्गत बीएनएसएस कायदा कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. परिसरातील हरविलेल्या व्यक्तींच्या नोंदींची पडताळणी सुरू केली असून संबंधित मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी तपास सुरू आहे. नागरिकांनी संबंधित व्यक्तीबाबत काही माहिती असल्यास भुसावळ तालुका पो.स्टे.शी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले. तपास हवलदार संदिप बडगे करत आहे.

….