जळगाव – जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील टहाकळी गावात अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पोलिओ डोस आणि अन्य लसीकरणानंतर अवघ्या दहा मिनिटांत अडीच महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. त्यानंतर शासकीय मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, जळगाव येथे मृतदेहासंदर्भात झालेल्या कथित निष्काळजीपणामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सचिता दीपक बोरसे या अडीच महिन्यांच्या बालिकेला जिल्हा परिषद शाळेत आयोजित लसीकरण मोहिमेदरम्यान पोलिओ डोस आणि अन्य लस देण्यात आली होती. मात्र लसीकरणानंतर काही मिनिटांतच तिची प्रकृती अचानक बिघडली. कुटुंबीयांनी तातडीने तिला चाळीसगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.
मृत बालिकेचे वडील दीपक बोरसे हे भारतीय सैन्यात कार्यरत असून सध्या अयोध्या येथे सेवेत असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर पोलिसांच्या मदतीने बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला.
मात्र रुग्णालयात पोहोचल्यानंतरही कर्मचाऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेतला नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे बालिकेचे आजोबा तुळशीदास मराठे हे आपल्या निष्पाप नातीचा मृतदेह मांडीवर घेऊन रात्रभर शवविच्छेदन विभागाबाहेर बसून राहिल्याचे समोर आले आहे. या घटनेचे फोटो आणि माहिती समोर आल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला असून रुग्णालय प्रशासनावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
दरम्यान, बालिकेच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. लसीकरणामुळे प्रतिक्रिया झाली की अन्य वैद्यकीय कारण होते, हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याचे सांगितले जात आहे.


