भुसावळ (प्रतिनिधी) – शहरात मे महिन्याच्या सुरुवातीलाच उष्णतेचा तीव्र तडाखा जाणवू लागला असून तापमानाने धोकादायक पातळी गाठली आहे. केंद्रीय जल आयोगाच्या नोंदीनुसार १२ मे रोजी शहराचे कमाल तापमान तब्बल ४५.८ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून यंदाही भुसावळ तापमानाचा नवा विक्रम मोडणार का, याची चर्चा रंगू लागली आहे.

मागील अनेक वर्षांपासून भुसावळ हे राज्यातील सर्वाधिक तापमान नोंदविणाऱ्या शहरांमध्ये अग्रस्थानी राहिले आहे. २००९ मध्ये येथे ४८.५ अंश सेल्सिअस असा विक्रमी पारा नोंदविण्यात आला होता. यंदाही तापमान सातत्याने वाढत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. ११ मे रोजी ४५.२ अंशांवर असलेले तापमान दुसऱ्याच दिवशी ४५.८ अंशांवर पोहोचले. वाढलेल्या आर्द्रतेमुळे उकाड्यात अधिक भर पडली असून नागरिक अक्षरशः घामाघूम होत आहेत.
दुपारी शहरात अघोषित संचारबंदीचे चित्र
प्रखर उन्हामुळे दुपारी १२ ते ५ या वेळेत शहरातील मुख्य बाजारपेठा, बसस्थानक परिसर तसेच राष्ट्रीय महामार्गावरील वर्दळ मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येत आहे. अत्यावश्यक कामांशिवाय नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. व्यापारी भागातही दुपारच्या सुमारास शांतता पसरल्याचे चित्र आहे.
तापमानवाढीमागे वृक्षतोड आणि सिमेंट रस्त्यांचा प्रभाव?
स्थानिक नागरिकांच्या मते, दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील वाढलेली वीजनिर्मिती, राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी झालेली मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड तसेच शहरातील सिमेंट रस्ते आणि पेव्हर ब्लॉक यामुळे तापमानात वाढ होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उष्णतेपासून बचावासाठी नागरिकांची धडपड
उन्हाच्या तीव्रतेपासून दिलासा मिळवण्यासाठी शहरातील थंड पेयांची दुकाने, रसवंतीगृहे, आईस्क्रीम पार्लर तसेच गारेगार गोळ्यांच्या गाड्यांवर मोठी गर्दी होत आहे. नागरिक डोक्यावर रुमाल, कॅप, गॉगल्स, स्कार्फ आणि सनकोटचा वापर करताना दिसत आहेत.
बाजारात कुलर, एसी, पंखे, वाळ्याच्या ताट्या, खस, सरबत आणि माठ यांची मागणी वाढली आहे. गरीबांचा फ्रिज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काळ्या माठांना विशेष मागणी असून ७० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत विविध प्रकारचे माठ विक्रीस उपलब्ध आहेत.
डॉक्टरांचा इशारा : उपाशीपोटी बाहेर पडू नका
नगरपालिका दवाखान्यात उष्माघात कक्ष सुरू करण्यात आला असून वैद्यकीय तज्ज्ञांनी नागरिकांना दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणे टाळण्याचे आवाहन केले आहे. भरपूर पाणी पिणे, हलका आहार घेणे, डोक्यावर संरक्षण ठेवणे आणि उघड्यावरचे खाद्यपदार्थ टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
वृद्ध, लहान मुले, गर्भवती महिला तसेच मधुमेह आणि हृदयरोग असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नळालाही येतेय ‘गीझर’सारखे गरम पाणी
प्रखर उन्हामुळे घरांवरील पाण्याच्या टाक्या तापल्या असून नळाला येणारे पाणीही गरम होत आहे. “नळाचे पाणी म्हणजे जणू गीझरचे पाणी,” अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. दिवसभर घरांमध्ये उकाडा कायम राहत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
जनजीवन विस्कळीत
उष्णतेच्या लाटेमुळे रिक्षाचालक, फेरीवाले, मजूर, प्रवासी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुपारच्या वेळी गरम वाऱ्यांचे चटके सहन करत काम करावे लागत असून उष्माघाताचा धोका वाढला आहे.
दुभत्या जनावरांवरही उष्णतेचा परिणाम
वाढत्या तापमानाचा परिणाम आता दुभत्या जनावरांवरही दिसून येत आहे. उष्णतेमुळे जनावरांची भूक कमी झाली असून दूध उत्पादनात घट झाल्याचे पशुपालकांनी सांगितले. अनेक ठिकाणी जनावरांसाठी पंखे, शेड आणि थंड पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी जनावरांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
पुढील तीन दिवसात तापमानात विक्रमी नोंद होण्याची शक्यता;
दिवसेंदिवस राज्यातील तापमानात मोठी वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वाढत्या तापमानाचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. विशेषत विदर्भात तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. बहुतांश जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात पुढील 3 दिवस उष्णतेची लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाडा उच्चांकी तापणार आहे. पुढील 3 दिवसात राज्यातील उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता आहे. पुढील 3 दिवस महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्याना उन्हाचा येलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती पुणे हवामान विभागाकडून सांगण्यात आली आहे.
अकोला आणि नंदुरबार जिल्ह्याचे तापमान 45.3 अंशाच्या पुढे आहे. सद्या राज्यातील बहुतांश जिल्ह्याचे तापमान 40 च्या पुढे आहे. नागरिकांनी पुढील 3 दिवस विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे पुणे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. पुढील 5 दिवसात पावसाची शक्यता नसल्याने तापमान घटण्याची शक्यता कमीच असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. दरम्यान, पुढील चार ते पाच दिवसात विदर्भात तापमानात मोठी वाढ होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. विदर्भातील काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
प्रादेशिक हवामान विभागाच्या नागपूर केंद्राकडून संपूर्ण विदर्भासाठी उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून, येत्या चार ते पाच दिवसांत तापमानात मोठी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मे महिन्याच्या उत्तरार्धात विदर्भात पुन्हा एकदा तीव्र उष्णतेच्या लाटेचा फटका बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
सध्या विदर्भात उष्णतेच्या लाटेसाठी पोषक वातावरण तयार झाले असून, ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’चा प्रभाव कमी होत चालल्याने उत्तरेकडील राज्यांतून गरम वारे वाहू लागले आहेत. त्याचा थेट परिणाम विदर्भाच्या तापमानावर होत असून, पुढील काही दिवसांत तापमानात तब्बल ४ ते ६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे विदर्भातील अनेक भागांमध्ये पारा पुन्हा ४५ ते ४६ अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची दाट शक्यता आहे.
एप्रिल महिन्यात यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर काही दिवस वातावरणात थोडा दिलासा मिळाला होता. मात्र, आता पुन्हा एकदा तापमान झपाट्याने वाढू लागल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. नागपूरसह अकोला, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्रता वाढू लागल्याचे चित्र दिसून येत आहे.
हवामान विभागाने नागरिकांना दुपारच्या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. पुरेसे पाणी पिणे, हलका आहार घेणे तसेच उन्हापासून संरक्षणासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. कालपासूनच विदर्भात उष्णलाटेचा प्रभाव तीव्र झाल्याचे जाणवत असून, येत्या काही दिवसांत उकाडा आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.


