तीन दिवस ‘हीट वेव्ह’चा इशारा ! जळगाव जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट; पारा ४६ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता

जळगाव (प्रतिनिधी )- जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून नागरिक हैराण झाले आहेत. रविवारी (दि. ११ मे) जळगावमध्ये कमाल तापमान ४४.३ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. हे तापमान सरासरीपेक्षा तब्बल १.७ अंशांनी अधिक असल्याने शहरासह ग्रामीण भागातही तीव्र उकाडा जाणवत आहे. किमान तापमान २६.५ अंश सेल्सिअस राहिले.

दरम्यान, हवामान विभागाने सोमवार ते बुधवार या कालावधीत जिल्ह्यात ‘हीट वेव्ह’ अर्थात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा दिला आहे. दि. १२ आणि १३ मे रोजी तापमान ४५ ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जळगाव शहरासह भुसावळ परिसरातही उच्चांकी तापमानाची नोंद होत असून दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. वाढत्या उष्णतेमुळे शेतकरी, मजूर, प्रवासी आणि बाहेर काम करणाऱ्या नागरिकांना उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. बाजारपेठांमध्येही दिवसभर शुकशुकाट दिसून येत असून सायंकाळनंतरच नागरिकांची गर्दी वाढत आहे.

प्रशासनाने नागरिकांना भरपूर पाणी पिणे, थेट उन्हात जाणे टाळणे, डोक्यावर टोपी किंवा कापड वापरणे तसेच आवश्यक असल्यासच बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे.

आठवडाभरातील तापमानाचा आलेख

४ मे – ४३.१ अंश सेल्सिअस ,५ मे – ४३.१ अंश सेल्सिअस,६ मे – ४३.१ अंश सेल्सिअस , ७ मे – ४२.६ अंश सेल्सिअस , ८ मे – ४२.६ अंश सेल्सिअस, ९ मे – ४२.६ अंश सेल्सिअस , १० मे – ४४.५ अंश सेल्सिअस या प्रमाणे

दरम्यान, १७ मे रोजी अंशतः ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे तापमानात काही प्रमाणात घट होऊन पारा ४१ अंशांपर्यंत खाली येण्याची शक्यता असून नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळू शकतो.