भुसावळ येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती उत्साहात साजरी :


भुसावळ (प्रतिनिधी) – येथे नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य तर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ११७ व्या जयंती कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रम प्रसंगी मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ डी. एम. पाटील उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त आरोग्य पर्यवेक्षक श्री भोजराज लोखंडे उपस्थित होते
आपले मनोगत व्यक्त करीत असताना प्राचार्य डॉ. पाटील यांनी आपल्या भाषणात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी दिलेला स्वच्छता, ग्रामविकास आणि व्यसनमुक्तीचा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी असल्याचे सांगितले. “ग्रामगीता” या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण समाजाला दिलेली दिशा अत्यंत मोलाची असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी मनोगत व्यक्त करीत असताना नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे नाशिक विभागीय संघटक प्रमुख प्रा. डॉ. दयाघन राणे यांनी आपल्या मनोगतात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कीर्तन, प्रवचन आणि प्रबोधनाच्या माध्यमातून समाजातील व्यसना सारख्या कुप्रथांवर प्रहार केला. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या काळातही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी प्रबोधना च्या माध्यमातून सामाजिक जागृती केलेली होती असे मत स्पष्ट केले.
कार्यक्रमास श्री. उमाकांत लोखंडे, डॉ. अनिल सावळे, डॉ. हेमंत भंगाळे, श्री. विजय पाटील, श्री. गजानन सेवलकर यांसह अनेक स्थानिक नागरिक, विद्यार्थी, तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ. माधुरी भंगाळे यांनी तर आभार प्रदर्शन सौ. कुमुदिनी राणे यांनी केले.