सुनसगाव येथे बारागाड्या व यात्रोत्सव!


भुसावळ ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील सुनसगाव येथे सालाबादप्रमाणे यंदाही दि. २१ एप्रिल रोजी श्री खंडेराव महाराज यात्रेचे आयोजन करण्यात आले असून भगत सुपडू मुरलीधर कंकरे हे बारा गाड्या ओढणार आहेत त्यांना बगले किरण बादशहा व युवराज कंकरे हे सहकारी राहणार आहे.

यात्रेनिमित्त खेळणी,पाळणे , मिठाई व इतर दुकाने थाटण्यात आली असून येथील मुख्य आकर्षण म्हणजे बारा गाड्या आहेत. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी दि.२२ रोजी रात्री सुकलाल व बाबुलाल भाऊ बोराडीकर यांच्या लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे.यात्रेत कोणत्याही प्रकारचा गोंधळ करु नये व यात्रा शांततेत पार पाडावी असे आवाहन यात्रा समिती अध्यक्ष सतिश पाटील व पोलीस पाटील खुशाल पाटील यांनी केले आहे.

तर वर्षातून एकदा हा यात्रेचा दिवस येतो आणि यात्रेनिमित्त बाहेर गावाहून नागरीक व नातेवाईक मंडळी आलेली असते त्यामुळे सर्वांनी यात्रेचा आनंद घ्यावा तसेच यात्रेत महिलांची मोठी गर्दी असते त्यामुळे महिला वर्गाला त्रास होईल असे कृत्य व गैरवर्तन कोणीच करू नये असे पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र काटे यांनी सांगितले आहे.

यात्रेत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी भुसावळ तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कुऱ्हा पानाचे औट पोष्टचे पोलीस कर्मचारी बंदोबस्त ठेवणार आहेत.