जळगावात भोंदूबाबाचा कारनामा उघड; भोंदूबाबा व त्याच्या पत्नीकडून एका महिलेची 11 लाखांची फसवणूक…

जळगाव – राज्यात भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण गाजत असताना जळगावतही एका भोंदू बाबाचा कारनामा हा उघड झाला आहे. भोंदू बाबा व त्याच्या पत्नीने एका महिलेची 11 लाखात फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

जळगावमध्ये भोंदू बाबा आणि त्याच्या पत्नीने एका महिलेची तब्बल 11 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी 2022 मध्येच गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी संबंधित आरोपी भोंदू बाबा व त्याची पत्नी अद्याप फरार आहेत.तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, तिच्या पतीच्या अंगात काहीतरी वाईट शक्ती असल्याचा बनाव करत भोंदू बाबा ललित पाटील आणि त्याची पत्नी मनोरमा पाटील यांनी विविध पूजा करण्यासाठी तिला भाग पाडले. यासाठी तिला राजस्थान, मध्य प्रदेशसह विविध ठिकाणी नेण्यात आले आणि अघोरी पूजा करण्याच्या नावाखाली मोठी रक्कम उकळण्यात आली.

या काळात आरोपींनी महिलेकडून तब्बल 11 लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. यात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.या संपूर्ण प्रकारात विशेष म्हणजे, आरोपी भोंदू बाबाची पत्नी मनोरमा पाटील ही पोलीस कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.

दरम्यान, तक्रारदार महिलेने जळगावच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन फरार आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.