भुसावळात ‘भीम जयंती’ उत्साहात; ३७ मिरवणुकांनी शहर दणाणले :

भुसावळ (प्रतिनिधी ) – भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात मंगळवारी अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. सायंकाळी ७ वाजता सुरू झालेला भीमसोहळा मध्यरात्री १२ वाजेपर्यंत शिस्तबद्धपणे पार पडला. अवघ्या पाच तासांत शहरातून एकूण ३७ मिरवणुका काढण्यात आल्या.

डीजेच्या तालावर ‘जय भीम’च्या जयघोषाने शहर दणाणून गेले होते. तापमान ४३.५ अंशांपर्यंत पोहोचले असतानाही आणि सायंकाळीही ३७ अंश उष्णता असतानाही भीमसैनिकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

सोमवारी मध्यरात्रीपासूनच जयंती उत्सवाला सुरुवात झाली. रेल्वे स्थानकाजवळील पादचारी पुलावरून अनुयायी जुन्या पालिका कार्यालयासमोरील आंबेडकर पुतळ्याकडे मोठ्या संख्येने दाखल होत होते. मंगळवारीही दिवसभर आणि मध्यरात्रीपर्यंत येथे अभिवादनासाठी गर्दी कायम होती.

शहर आणि बाजारपेठ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत मिरवणुकांचे नियोजन करण्यात आले होते. राहुल नगर, धम्म नगर, महात्मा फुले नगर, पंचशील नगर, गौतम नगर आदी भागांतून सर्वाधिक मिरवणुका निघाल्या. नागसेन कॉलनीतील जेतवन बुद्ध विहारच्या मिरवणुकीत हजारोंची उपस्थिती होती.

मिरवणुकांमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित सजीव देखावे हे प्रमुख आकर्षण ठरले. नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून हे देखावे पाहिले. महिला आणि युवतींचा सहभागही लक्षणीय होता.

सेवाभावी संस्थांनी मिरवणुकीदरम्यान थंड पाणी, मसाले भात, पुलाव, खिचडी, लाडू व मिठाईचे वाटप करून सेवा दिली.

सुरक्षेच्या दृष्टीने २५० पोलिस कर्मचारी, १०० होमगार्ड तैनात करण्यात आले होते. डीवायएसपी केदार बारबोले यांनी स्वतः बंदोबस्ताची पाहणी केली. सीसीटीव्ही आणि ड्रोनद्वारे संपूर्ण मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यात आले.

वाहतुकीच्या दृष्टीने जामनेर रोडवर काही काळ ताण निर्माण झाला. दोन वाहनांच्या धडकेमुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

दरम्यान, जयंतीनिमित्त रेल्वे स्थानकाजवळील बसस्थानक तात्पुरते हलवण्यात आले होते. बुधवारपासून बसस्थानक पुन्हा मूळ ठिकाणी सुरू होणार आहे .

यंदाच्या उत्सवात लंडनमधील डॉ. आंबेडकरांच्या निवासस्थानाची ६० फूट उंच आरास आणि विद्युत रोषणाई हे विशेष आकर्षण ठरले.