अनाथ व गरजू मुलांसाठी निस्वार्थ सेवेतून उभा राहिलेला आदर्श

भुसावळ (प्रतिनिधी) : अनाथ व गरजू मुलांसाठी कार्य करणाऱ्या माहेर आश्रमाला दिलेल्या भेटीतून अत्यंत भावस्पर्शी आणि प्रेरणादायी अनुभव मिळाल्याची भावना डॉ. मधू आणि राजेश मानवतकर यांनी व्यक्त केली.
धम्मचारी श्री अनिरुद्ध सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही भेट पार पडली. अत्यंत व्यस्त वेळापत्रकातूनही त्यांनी पाहुण्यांसाठी वेळ काढून त्यांचे आत्मीयतेने स्वागत केले. पाहुण्यांच्या आगमनापूर्वीच माहेर संस्थेच्या कार्यालयात सर्व व्यवस्था प्रेमाने करण्यात आली होती. संस्थेतील अधिकारी व कर्मचारी स्वागतासाठी उत्सुक असल्याचे वातावरणात जाणवत होते.
माहेरचे कार्यकर्ते श्री मंगेश यांनी पाहुण्यांना संस्थेच्या मुख्य कार्यालयाची ओळख करून दिली तसेच सर्व कर्मचाऱ्यांशी परिचय करून दिला. त्यानंतर अनिरुद्ध सर, माहेरचे रहिवासी आणि लहान मुलांनी सुंदर स्वागतगीत सादर करून पाहुण्यांचे मनापासून स्वागत केले.
या भेटीदरम्यान अनिरुद्ध सर यांचे माहेर संस्थेबद्दल असलेले प्रेम, जिव्हाळा आणि निस्वार्थ बांधिलकी पाहून पाहुणे भारावून गेले. संस्थेत मिळालेले साधे पण स्वादिष्ट सात्विक भोजनही सर्वांच्या मनाला स्पर्शून गेले.
डॉ. मधू आणि राजेश मानवतकर यांनी सांगितले की, अनिरुद्ध सर यांचे मेट्टा, प्रेम आणि मार्गदर्शन त्यांच्या आयुष्यात महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरेल. शुद्ध अंतःकरण, करुणा आणि निस्वार्थ भावनेने एक व्यक्ती हजारो अनाथ व गरजू मुलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकते, याची जाणीव या भेटीतून झाली.
फोटो कॅप्शन : माहेर आश्रमाला भेट देताना डॉ. मधू आणि राजेश मानवतकर यांचे अनिरुद्ध सर व माहेर परिवाराकडून स्वागत करण्यात आले.



