भुसावळ ( प्रतिनिधी ) – रोटरी क्लब ऑफ भुसावळ येथे जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शहरातील प्रख्यात प्राध्यापिका डॉ. सौ. विद्या पाटील यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच रोटरी क्लबच्या महिला सदस्या आणि क्लब सदस्यांच्या कुटुंबातील महिलांचाही सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचावा यासाठी नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य यांनी पुरवलेल्या व्यसनमुक्ती जनजागृती पोस्टरचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला रोटरी क्लबचे सचिव रत्नाकर क्षीरसागर यांनी जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांनी विकास आणि सामाजिक क्षेत्रात संधी मिळवण्यासाठी केलेल्या संघर्षाचा इतिहास सांगितला. तसेच महिला दिन साजरा करण्यामागील उद्दिष्टेही स्पष्ट केली.
सत्काराला उत्तर देताना प्रा. डॉ. विद्या पाटील यांनी त्यांच्या अनुभवातून काही प्रेरणादायी प्रसंग सांगितले. महिलांनी ठाम निश्चय केला तर त्या कठीण परिस्थितीतही यशस्वी होऊ शकतात आणि समाजाच्या प्रगतीत मोठे योगदान देऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले. स्वतःच्या शिक्षणातील अनुभव सांगताना त्यांनी सांगितले की, एम.एस्सी. शिक्षणासाठी कोल्हापूर विद्यापीठात प्रवेश घेतल्यानंतर आई-वडिलांचा विश्वास टिकवून ठेवत त्यांनी या अभ्यासक्रमात सुवर्णपदक मिळवले.
या कार्यक्रमात रो. डॉ. माया आर्विकर, रो. आरती चौधरी, रो. चारू महाजन यांच्यासह सौ. लता अय्यर, सौ. कुमुदिनी राणे, सौ. संजीवनी क्षीरसागर, सौ. सरला बोरकर, सौ. पद्मा तिवारी, सौ. पाटील व सौ. विजया निकम या महिलांचा भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. संजय चापोरकर यांनी महिलांच्या सामाजिक विकासातील योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. महिलांनी पुढाकार घेतल्यास कुटुंब आणि समाजाच्या प्रगतीसाठी मोठे कार्य होऊ शकते तसेच व्यसनांना आळा घालण्याची ताकदही महिलांमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. आरती चौधरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिव रत्नाकर क्षीरसागर यांनी केले.
या कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ भुसावळचे अध्यक्ष रो. संजय चापोरकर, सचिव रो. रत्नाकर क्षीरसागर, प्रेसिडेंट एनक्लेव चेअरपर्सन रो. गजानन ठाकूर, रो. डॉ. एन. एस. आर्वीकर, रो. अशोक निकम, रो. गोपीनाथ अय्यर, रो. गोपाल तिवारी, रो. डॉ. दयाघन राणे, रो. गजानन सेवलकर, रो. मदन बोरकर, रो. अनंत पाटील आदी उपस्थित होते.


