भुसावळ (प्रतिनिधी ). – मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात धूम्रपानविरोधी जनजागृतीसाठी नुक्कड नाटकाचे आयोजन करण्यात आले. ११ मार्च २०२६ रोजी भारत स्काऊट्स अँड गाईड्सच्या इंदिरा गांधी ओपन ग्रुपतर्फे ‘नो स्मोकिंग (धूम्रपान निषेध)’ या विषयावर हा उपक्रम राबविण्यात आला.

या अंतर्गत एम.ओ.एच. इलेक्ट्रिक लोको शेड तसेच भुसावळ रेल्वे स्थानक परिसरात नुक्कड नाटक सादर करण्यात आले. या नाटकाद्वारे नागरिक, प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना धूम्रपानाचे घातक परिणाम समजावून सांगण्यात आले. धूम्रपानामुळे होणारे विविध आरोग्यदोष, गंभीर आजार तसेच त्याचे स्वतःवर, लहान मुलांवर, कुटुंबीयांवर आणि समाजावर होणारे दुष्परिणाम प्रभावीपणे मांडण्यात आले. यामधून धूम्रपानापासून दूर राहण्याचा संदेश देण्यात आला.
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे किती घातक आहे याबाबतही या नाटकातून जनजागृती करण्यात आली. तसेच धूम्रपानमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमाला प्रवासी, रेल्वे कर्मचारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात भारत स्काऊट्स अँड गाईड्सचे सदस्य सक्रियपणे सहभागी झाले होते. या वेळी संस्थेचे पदाधिकारी, सदस्य तसेच रेल्वे कर्मचारी उपस्थित होते.
भुसावळ विभागाकडून समाजात आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार व्हावा यासाठी वेळोवेळी अशा जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन केले जात असल्याची माहिती देण्यात आली.



