जळगावात भर चौकात गोळीबार; वडिलांवरील हल्ल्याचा बदला घेण्याचा प्रयत्न :

जळगाव (प्रतिनिधी) – शहरात मंगळवारी दुपारी भर दिवसा गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. वडिलांवर झालेल्या मारहाणीचा राग अनावर झाल्याने संतापलेल्या मुलाने मारहाण करणाऱ्या तिघांवर गावठी कट्ट्यातून दोन राउंड गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या गोळीबारात कोणालाही दुखापत झाली नाही.

ही घटना घरकुल चौक परिसरात घडली असून, हा भाग शनी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. गोळीबाराचा आवाज होताच परिसरात एकच धावपळ उडाली आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच शनी पेठ पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही गटातील तिघांना ताब्यात घेतले आहे.

गोळीबाराच्या घटनेत प्रशांत चौधरी, हिमांशू शुक्ला, कृष्णा सूर्यवंशी आणि अक्षय तायडे यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, गोळीबार करून फरार झालेला मुख्य संशयित अनिल राठोड याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास पोलीस करत आहेत.