तरुणीचा पाठलाग करून लग्नासाठी दबाव; नकार दिल्यास भावाला जीवे मारण्याची धमकी

जळगाव : शहरातील एका १९ वर्षीय तरुणीचा सतत पाठलाग करून तिच्यावर प्रेमसंबंध ठेवण्याचा व लग्न करण्याचा दबाव टाकत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तसेच तरुणीने नकार दिल्यास तिला आणि तिच्या लहान भावाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशन जळगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित सलमान सागीर काकर (रा. पंचशील नगर) हा फेब्रुवारी २०२५ पासून संबंधित तरुणीचा वारंवार पाठलाग करत होता. तो वेळोवेळी तिला माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव व माझ्याशीच लग्न कर, असा दबाव टाकत होता.

दरम्यान, ८ मार्च रोजी संशयिताने तरुणीला शामा फायर परिसरात अडवले. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवून पुन्हा लग्नाचा दबाव टाकला. तसेच “तुझे दुसरीकडे लग्न होऊ देणार नाही. जर तू तसे केले तर तुला आणि तुझ्या लहान भावाला मारून टाकेन,” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

घडलेला प्रकार तरुणीने कुटुंबीयांना सांगितल्यानंतर त्यांनी तातडीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संशयिताविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ गणेश वंजारी करीत आहेत.