भुसावळ नगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांचे उपोषण माजी आमदारांच्या मध्यस्थीने मागे; १० पैकी ७ मागण्या मान्य ;

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ नगरपालिका येथील सफाई कर्मचाऱ्यांनी विविध १० मागण्यांसाठी १० मार्च २०२६ रोजी केलेले उपोषण चर्चेनंतर यशस्वीरीत्या सोडवण्यात आले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार संतोष भाऊ चौधरी, गटनेते सचिन चौधरी यांनी आंदोलनकर्त्यांशी प्रत्यक्ष चर्चा केली. यावेळी नगरसेवक अकील पिंजारी, दुर्गेश ठाकूर आदी उपस्थित होते.

पालिकेसमोर आयोजित या आंदोलनात बसलेल्या उपोषणकर्ते यांचे सोबत झालेल्या चर्चेदरम्यान सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. व एका दिवसातच आंदोलनकर्त्यांच्या एकूण दहा मागण्यांपैकी सात मागण्या मान्य करण्यात आल्या असून उर्वरित मागण्यांवरही पुढील स्तरावर चर्चा करण्याचे आश्वासन देण्यात आले.

चर्चेनंतर आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त करत उपोषण मागे घेतले. गटनेते सचिन चौधरी यांनी सरबत देऊन उपोषण सोडण्याची औपचारिकता पूर्ण केली.

समाजाच्या प्रश्नांवर संवादाच्या माध्यमातून मार्ग काढण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरला असून, यामुळे मेहत्तर समाजातील सफाई कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.