पळसवाडी जवळ बसला आग; प्रवासी जेवणासाठी उतरल्याने मोठी दुर्घटना टळली

खुलताबाद, — छत्रपती संभाजीनगर–धुळे महामार्गावर पळसवाडी येथील आम्रपाली हॉटेलसमोर मंगळवारी दुपारी सुमारे चार वाजता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शहादा आगारातील बसला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी जेवणासाठी खाली उतरलेले असल्याने मोठी दुर्घटना टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, शहादा आगाराची शहादा ते संभाजीनगर ही बस प्रवाशांना घेऊन नियमित फेरीवर होती. दुपारी सुमारे चारच्या सुमारास चालक व वाहक यांनी पळसवाडी येथील आम्रपाली हॉटेलसमोर जेवणासाठी बस थांबवली. सर्व प्रवासी खाली उतरल्यानंतर काही वेळातच बसमधून धूर निघू लागला. क्षणातच आगीने भीषण रूप धारण करत बस पेटली.

प्राथमिक अंदाजानुसार, बस दीर्घ प्रवास करून येत असल्यामुळे इंजिनमध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण झाली होती. त्यामुळे बस ओव्हरहिट होऊन शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बस हॉटेलसमोर थांबलेली असल्याने आणि वेळीच धूर दिसल्यामुळे चालक, वाहक व स्थानिकांनी प्रवाशांना सुरक्षित अंतरावर हलवले.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.

दरम्यान, एका प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने सांगितले की, “आम्ही जेवणासाठी खाली उतरलो आणि काही वेळातच बसला आग लागली. जर ही घटना धावत्या बसमध्ये घडली असती, तर मोठी जीवितहानी झाली असती.”

या घटनेमुळे काही काळ महामार्गावर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.