भालोद (प्रतिनिधी ) – येथील कला व विज्ञान महाविद्यालयात शिक्षकांच्या अध्यापन कौशल्यवृद्धीसाठी “Innovative Teaching with Digital Tools” या विषयावर कार्यशाळा तसेच “Research Grants: Opportunities and Application Strategies” या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी जळगाव येथील मुळजी जेठा महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. केतन नरखेडे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून शिक्षकांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जी. कोल्हे होते, तर उपप्राचार्य प्रा. एम. टी. चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या वेबसाइट व आयटी सेल तसेच इनोवेशन व इनक्युबेशन सेल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या उपक्रमासाठी डॉ. जी. आर. चौधरी, प्रा. डी. एच. पाटील आणि प्रा. राकेश चौधरी यांनी समन्वयक म्हणून नियोजन व आयोजन केले.
मार्गदर्शन करताना डॉ. केतन नरखेडे यांनी आधुनिक शिक्षण व्यवस्थेत डिजिटल साधनांचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. विविध ऑनलाइन अध्यापन साधने, डिजिटल प्रेझेंटेशन पद्धती, विद्यार्थीकेंद्रित शिक्षण तंत्रे आणि अध्यापन अधिक प्रभावी करण्यासाठी वापरता येणाऱ्या तांत्रिक साधनांविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या पार्श्वभूमीवर शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याची गरज त्यांनी स्पष्ट केली.
याशिवाय त्यांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांकडून उपलब्ध होणाऱ्या संशोधन अनुदानाच्या संधी, संशोधन प्रकल्प प्रस्ताव तयार करण्याची पद्धत, अर्ज करताना घ्यावयाची काळजी तसेच संशोधनासाठी निधी मिळविण्याच्या प्रभावी पद्धतींबाबत मार्गदर्शन केले. शिक्षकांनी संशोधन क्षेत्रात अधिक सक्रिय होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. मोहिनी तायडे यांनी केले, तर प्रा. डी. एच. पाटील यांनी उपस्थित मान्यवर व सहभागींचे आभार मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे शिक्षकांना डिजिटल अध्यापन तंत्रे, संशोधन अनुदानाच्या संधी आणि आधुनिक शिक्षण पद्धतींबाबत उपयुक्त मार्गदर्शन मिळाले.


