भुसावळ ( प्रतिनिधी) –

शुक्रवारी साजरी होणारी शिवजयंती शांततेत व निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले असून हुल्लडबाजी करणारे व उपद्रवी घटक पोलिसांच्या रडारवर आहेत. शिवजयंती मिरवणुकांमध्ये कानठळ्या बसवणाऱ्या डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे तसेच रात्री १० वाजेपर्यंतची वेळमर्यादा काटेकोरपणे पाळावी, अशा सूचना डीवायएसपी केदार बारबोले यांनी दिल्या.
बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या आवारात बुधवारी दुपारी शिवजयंती उत्सव समिती व शांतता समितीच्या सदस्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पोलिस प्रशासनाकडून उत्सवासाठीची आचारसंहिता स्पष्ट करण्यात आली. मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे बारबोले यांनी सांगितले.
निरीक्षक राहुल वाघ यांनी रात्री १० नंतर मिरवणूक सुरू ठेवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला. बैठकीस शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक उद्धव डभाळे तसेच शहर वाहतूक शाखेचे एपीआय उमेश महाले उपस्थित होते.
मशाल रॅलीचे नियोजन
गुरुवारी रात्री ११.५० वाजता शहरात मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात येणार असून रेल्वे स्थानकासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ तिचा समारोप होईल. या मार्गावर प्रकाश व्यवस्थेसाठी पालिका प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. मध्यरात्री महाराजांच्या पुतळ्याजवळ जल्लोषही केला जाणार आहे.


