रस्तालूट करणारे भोई वाड्यातील तिघे जेरबंद : नवोदय शाळेसमोरिल मध्यरात्रीची घटना

भुसावळ (प्रतिनिधी ) – शहरातील नवोदय विद्यालय परिसरातील पुलाखाली मंगळवारी (दि.३) मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास दुचाकीवरून जाणाऱ्या प्रवाशांना अडवून मारहाण व लुटल्याची घटना घडली. मात्र, फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाईकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाने पळून जाणाऱ्या तिन्ही संशयितांना पाठलाग करून पकडण्यात आहे. तिघे भोईवाड्यातील रहिवासी आहेत.

कासोदा (ता. एरंडोल) येथील रहिवासी इश्तियाक खान अजीज खान हे. त्यांचे काकाचा मुलगा साबीर खान यांच्यासह दुचाकीने ( एमएच.५४-ए.४३६८) कासोद्याकडे जात होते. सोबत त्यांचे मेहुणे

अनिस शेख व मोहसीन खान हे दुसऱ्या दुचाकीवर पुढे चालले होते. नवोदय विद्यालयाजवळील पुलाखालील स्पीड ब्रेकरजवळ तीन अज्ञातांनी त्यांना अडवले. तुमच्या दुचाकीचा आमच्या गाडीला कट लागला, असे म्हणत मारहाण सुरू केली. इश्तियाक यांच्या खिशातील ६ हजार रुपये हिसकावून घेतले. हा प्रकार पाहून इश्तियाक यांचे मेहुणे मदतीसाठी माघारी फिरले हे पाहून तिन्ही संशयित त्यांची दुचाकी सोडून पळू लागले. मात्र, इश्तियाक व सहकाऱ्यांनी त्यांना काही अंतरावर पकडले. भुसावळमधील मित्र आणि पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.