भुसावळ शिवमहापुराण : गांधी पुतळा ते कथास्थळ मार्गावर टपऱ्या उचलणार : प्रांतांनी दिले निर्देश

भुसावळ (प्रतिनिधी) – पाडळसे जवळील अकलूद शिवारात १० ते १६ मार्चदरम्यान सिहोरवाले पं. प्रदीप मिश्रा यांची शिवमहापुराण कथा होत आहे. या पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसांत शहरातील गांधी पुतळा ते कथास्थळ या मार्गावरील सर्व टपऱ्या व हातगाड्या हटवून रस्ता मोकळा करण्यात येणार आहे.

बुधवारी कथास्थळी झालेल्या बैठकीत प्रांत जितेंद्र पाटील यांनी संबंधित विभागांना हे निर्देश दिले. फैजपूरचे प्रांत बबन काकडे, डीवायएसपी केदार बारबोले, फैजपूरचे डीवायएसपी अनिल बडगुजर, सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोलाळे, तहसीलदार नीता लबडे, वाहतूक शाखेचे अधिकारी उमेश महाले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीत कथास्थळी पार्किंग व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, वाहतूक मार्गातील बदल, मंडप उभारणी, भाविकांचे भोजन, आंघोळीची व्यवस्था, स्वच्छता आदी मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.