भुसावळ (प्रतिनिधी ) – शहरातील भिरूड हॉस्पिटल परिसरातील संगतसाहेब गुरुद्वारासमोर दुचाकी लावण्याच्या कारणावरून मंगळवार रोजी सायंकाळी सहा वाजता वाद होऊन मारहाण व दगडफेकीची घटना घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनूसिंग दिपसिंग बावरा (वय ४२, रा. भिरूड हॉस्पिटलजवळ) हे आपल्या मित्रांसह संगतसाहेब गुरुद्वारासमोर उभे होते. यावेळी भूषण मिस्तरी उर्फ बॉबी आणि प्रसाद किनगे उर्फ खब्या हे तेथे आले. त्यांनी गुरुद्वारासमोर लावलेल्या दुचाकी काढण्यास सांगत शिवीगाळ केली. तसेच गाड्या तातडीने बाजूला न केल्यास त्या जाळून टाकण्याची धमकी दिली.
याला सोनूसिंग बावरा तसेच त्यांच्यासोबत असलेले जसपाल सिंग आणि विक्की सिंग यांनी विरोध केला. त्यानंतर भूषण मिस्तरी व प्रसाद किनगे यांनी त्यांना मारहाण केली. पुढे त्यांनी नमस्कार मंडळाचे टी-शर्ट घातलेल्या सुमारे १० ते १५ साथीदारांना बोलावून घेतले. या टोळक्याने गल्लीत उभ्या असलेल्या नागरिकांवर दगडफेक केली.
या दगडफेकीत सोनूसिंग बावरा यांच्या डाव्या खांद्याला व कानाजवळ दगड लागून दुखापत झाली. तसेच गल्लीतील इतर काही नागरिकही जखमी झाले. या घटनेमुळे भिरूड हॉस्पिटल परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
याप्रकरणी सोनूसिंग बावरा यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून तपास सुरू असल्याची माहिती निरीक्षक राहुल वाघ यांनी दिली.


