यावल – चोपडा–यावल राष्ट्रीय महामार्गावर भरदिवसा घडलेल्या लूटमारीच्या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. चुंचाळे फाट्याजवळ दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी चाकूचा धाक दाखवत भुसावळ येथील एका व्यक्तीकडून तब्बल २४ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम लुटून नेल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.

किरण प्रभाकर पाटील (वय ५०, रा. राम मंदिर वार्ड, भुसावळ) हे भुसावळ येथील एका खासगी कंपनीत कार्यरत आहेत. ते चोपडा येथून २४.५० लाख रुपयांची रोख रक्कम बॅगेत घेऊन दुचाकीने भुसावळकडे जात असताना चुंचाळे फाट्याजवळ पाठीमागून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांची दुचाकी अडवली. चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत रोख रकमेची बॅग हिसकावून घेत वेगाने पलायन केले.
अचानक घडलेल्या या घटनेमुळे पाटील हे प्रचंड हादरले होते. त्यांनी तातडीने यावल पोलीस ठाण्यात धाव घेऊन घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. तसेच फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांनीही घटनास्थळाची पाहणी केली.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून आरोपी ज्या मार्गाने पळून गेले त्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
भरदिवसा, वर्दळीच्या राष्ट्रीय महामार्गावर घडलेल्या या धाडसी लूटमारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे.


