भुसावळ (प्रतिनिधी ) –
अमृतसर (पंजाब) येथे सिख गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित ७व्या नॅशनल सिख गेम्स २०२५ अंतर्गत झालेल्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्राने मानाचा तुरा रोवला आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेत जळगाव जिल्ह्याच्या आणि भुसावळ तालुक्यातील वांजोळा येथील प्राथमिक शिक्षिका श्रीमती ज्योती मुरलीधर वानखेडे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.

जिल्हा परिषद शाळा वांजोळा (ता. भुसावळ) येथे कार्यरत असलेल्या ज्योती वानखेडे यांनी योगासन क्षेत्रात सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे यश संपादन केले. राष्ट्रीय स्तरावरील ही स्पर्धा अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते.
या उल्लेखनीय यशाच्या जोरावर ज्योती वानखेडे यांची निवड आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी झाली असून, ही स्पर्धा जानेवारी २०२६ मध्ये थायलंड येथे होणार आहे. त्यांच्या या यशामुळे जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


