धरणगाव (प्रतिनिधी ) –
धरणगाव तालुका तलाठी व मंडळ अधिकारी संघटनेच्या वतीने आज शुक्रवार दिनांक १९ रोजी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी लेखणी बंद आंदोलन करून प्रशासनाच्या भूमिकेविरोधात तीव्र निषेध नोंदवण्यात आला.

मौजे पिंप्राळा, ता. जळगाव येथे दिनांक १ डिसेंबर २०२५ रोजी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांचे झालेल्या अन्यायकारक निलंबनाच्या निषेधार्थ तसेच मौजे मांडळ, ता. अमळनेर येथे दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यावर वाळू माफियाकडून झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या घटनेनंतर तब्बल १५ दिवस उलटूनही आरोपींना अटक न झाल्याने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
महसूल कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला. संबंधित दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, तसेच हल्लेखोरांना अटक करण्यात यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
या आंदोलनात ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी तसेच संवर्गातील महसूल सहाय्यक अधिकारी आदींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.



