भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलचे दोन दिवसीय स्नेहसंमेलन दि. १६ रोजी उत्साहात व आनंदी वातावरणात संपन्न झाले. कार्यक्रमास भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) संदीप गावित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांची विशेष उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील होते. यावेळी संस्थेच्या सचिव डॉ. वर्षा पाटील व शाळेच्या प्राचार्या अनघा पाटील व्यासपीठावर उपस्थित होत्या.
प्रमुख पाहुणे संदीप गावित यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी बोलताना डीवायएसपी संदीप गावित यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना सायबर क्राईम तसेच विविध प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करावे, असेही त्यांनी सांगितले.
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणासोबतच संस्कार व शिस्तीचे महत्त्व अधोरेखित केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या.
स्नेहसंमेलनाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य व कलागुण सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणास उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुनम कुंदू यांनी केले, तर आभार प्रदर्शन कॅलेब खंडागरे यांनी मानले.


