मुंबई : भारतीय रेल्वेकडून तत्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता वाढवण्यासाठी ओटीपी-आधारित प्रमाणीकरण प्रणाली टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येत आहे. या अंतर्गत मध्य रेल्वेवरील आणखी पाच गाड्यांमध्ये ही नवीन प्रणाली १९ डिसेंबर २०२५ पासून कार्यान्वित होणार आहे.

मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील गाड्यांसाठी तत्काळ तिकीट बुकिंग करताना ओटीपी प्रमाणीकरण अनिवार्य असेल :
- 11029 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कोल्हापूर कोयना एक्सप्रेस
- 11055 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोंडा गोदान एक्सप्रेस
- 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस – जयनगर एक्सप्रेस
- 11025 पुणे जंक्शन – अमरावती एक्सप्रेस
- 12157 पुणे जंक्शन – सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस
ही ओटीपी-आधारित प्रणाली संगणकीकृत पीआरएस काउंटर, अधिकृत रेल्वे एजंट तसेच आयआरसीटीसीच्या वेबसाइट व मोबाईल ॲपद्वारे बुक होणाऱ्या तत्काळ तिकिटांसाठी लागू राहणार आहे. बुकिंगदरम्यान प्रवाशाने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर एकदाच वापरता येणारा संकेतांक (ओटीपी) पाठवला जाईल. ओटीपीची यशस्वी पडताळणी झाल्यानंतरच तत्काळ तिकीट जारी करण्यात येणार आहे.
रेल्वे प्रशासनाच्या मते, या नव्या उपाययोजनेमुळे तत्काळ कोट्यातील तिकिटांचा गैरवापर रोखण्यास मदत होईल तसेच खऱ्या प्रवाशांपर्यंत या सुविधेचा लाभ पोहोचेल.
दरम्यान, मध्य रेल्वेकडून प्रवाशांना आवाहन करण्यात आले आहे की, तत्काळ तिकीट बुकिंग करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आपला मोबाईल क्रमांक अचूकपणे नोंदवावा.


