भुसावळ (प्रतिनिधी):
भारतीय बौद्ध महासभा महिला व पुरुष विभागाच्या वतीने भुसावळ शहर व परिसरात एकूण आठ ठिकाणी दहा दिवशीय “महिला उपासक व समता सैनिक दल” शिबिरांचे भव्य उद्घाटन आज उत्साहात पार पडले. शिलरत्न बुद्ध विहार फेकरी, खडका, निंभोरा, कपिल नगर, फुलगाव, पंचशील नगर (भुसावळ), अकलुद आदी ठिकाणी ही शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.

या शिबिरांचा मुख्य उद्देश महिलांना बौद्ध धम्माची शिकवण, समता सैनिक दलाची शिस्त तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जाणीव करून देणे हा आहे.
शिबिरांचे उद्घाटन महिला जिल्हाध्यक्ष प्रियंका अहिरे, जिल्हा सरचिटणीस वैशाली सरदार, जिल्हाध्यक्ष सुमंगल तथा रविंद्र अहिरे, राज्य संघटक लताताई तायडे व संस्कार विभागाच्या जिल्हा उपाध्यक्ष सुमित्रा सर्वटक यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष समता सैनिक दल मेजर रमेश साळवे, जिल्हा सचिव समता सैनिक दल वनिता साळवे, जिल्हा संघटक वनमाला हिवाळे, जिल्हा उपाध्यक्ष करुणा नरवाडे, भुसावळ शहर महिला अध्यक्ष प्रतिभा सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष (प्रचार व पर्यटन) प्रकाश सरदार, केंद्रीय शिक्षिका सीमा अहिरे, जिल्हा सचिव वसंतदादा लोखंडे, जामनेर तालुका कार्यालयीन सचिव मुकुंद सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिराच्या प्रारंभी भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी त्रिशरण व पंचशील घेतले. मान्यवरांनी उपस्थित महिलांना धम्म मार्गदर्शन केले. शिबिरांमध्ये महिलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला असून धम्म प्रचाराला अधिक बळ मिळाले आहे.
या दहा दिवशीय शिबिरांचा समारोप शुक्रवार, दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी “त्रिरत्न बुद्ध विहार, निंभोरा (दीपनगर)” येथे आयोजित जिल्हा महिला धम्म परिषद द्वारे करण्यात येणार आहे. या परिषदेला प्रा. अंजलीताई आंबेडकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. जिल्हा सरचिटणीस वैशाली सरदार यांनी जिल्ह्यातील सर्व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
शिबिरांच्या यशस्वी आयोजनासाठी चंदा खंडारे, वैशाली जाधव, वनमाला हिवाळे, करुणा नरवाडे, वनिता साळवे, प्रतिभा सोनवणे, प्राज्ञ मेश्राम, ऊषा सुरवाडे, शीला साळवे, निशा वाघ, मंजुळा इंगळे, बनाबाई इंगळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या माध्यमातून “चलो बुद्ध की ओर” ही घोषणा प्रत्यक्षात उतरत असून भुसावळ परिसरात धम्माचा प्रचार व प्रसार जोमाने सुरू आहे. या शिबिरांमुळे महिलांना समता, करुणा व मैत्रीच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


