भुसावळात महिलांविरुद्ध हिंसाचार याविषयावर रॅली : अनोखा उपक्रम : बियाणी मिलीटरी स्कुलचा अनोखा उपक्रम :


भुसावळ (प्रतिनिधी ) – इनरव्हील क्लब ऑफ खरगोन व इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ,इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी यांच्या तर्फे नुकताच दि ६ रोजी भुसावळ येथील बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये महिलांवर होणारे हिंसाचार थांबवा या विषयावर एक भव्य जागरूकता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात जेसीआयचे सदस्य उपस्थित होते. तिन्ही क्लबच्या सदस्यांसह,बियाणी मिलिटरी स्कूलमधील १२०० विद्यार्थी व शिक्षकांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला होता.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या इंटरनॅशनल इनरव्हीलच्या कोषाध्यक्षा डॉ.रश्मी शर्मा व मध्य प्रदेशातील इनरव्हील क्लब जिल्हा ३०४ च्या जिल्हा सचिव स्मिता बियाणी या विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.बियाणी गृपच्या सचिव डॉ.संगीता बियाणी यांची उपस्थिती होती.रॅलीची सुरुवात आकाशात नारंगी बलून सोडून झाली.रॅली ही बियाणी मिलिटरी स्कूल परिसरात काढण्यात आली. सर्व सदस्य आणि विद्यार्थ्यांनी महिलांवरील हिंसाचार थांबवा या विषयावर विविध घोषणा देत पोस्टर्स हातात घेतले होते. रॅलीत नारंगी पोशाख घातलेल्या सदस्यांचे आणि नारंगी टोप्या आणि स्कार्फ घातलेल्या विद्यार्थ्यांचे दृश्य प्रभावीपणे संदेश देत होते.
विद्यार्थ्यांनी स्वागत नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात केली.इनरव्हील क्लब भुसावळच्या वैशाली भगत आणि त्यांच्या जेसीआय टीमने निर्भया प्रकरणावर आधारित एक प्रभावी पथनाट्य सादर केले.
शाळेतील मुलींनी कराटे आणि लाठी (काठी) प्रशिक्षण देखील दाखवले.
बियाणी मिलीटरी स्कुलने थीमवर आधारित पोस्टर स्पर्धा आयोजित केली होती,पहिल्या तीन विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आयुषी बियाणी यांनी केले.
इनर व्हील क्लब भुसावळच्या अध्यक्षा सुनंदा भारुळे,सचिव सविता शुक्ला,इनर व्हील क्लब भुसावळ रेलसिटीच्या सचिव योगिता वायकोळे आणि दोन्ही क्लबचे वरिष्ठ सदस्य तसेच कमल सचदेव, मनीषा चौधरी,सुनीता पाचपांडे उपस्थित होते.

फोटो ओळ – भुसावळ येथील बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये काढण्यात आलेल्या महिलांवर होणाऱ्या अत्याचार विरोधात रॅलीत प्रा रश्मी शर्मा व स्मिता बियाणी सह विद्यार्थी. (छाया – निरज पाटील)