भुसावळ, (प्रतिनिधी ) — शहरातील जामनेर रोडवरील सिंधी कॉलनी परिसरातील नगरपालिका मालकीच्या सार्वजनिक शौचालयाचे दोन्ही प्रवेशद्वार अज्ञात व्यक्तींनी लोखंडी पत्रे लावून बंद केल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. जामनेर रोडपासून अवघ्या १० मीटर अंतरावर रोहित्राजवळ असलेल्या या शौचालयाच्या अचानक बंदोबस्तामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.

स्थानिकांच्या मते, काही भूमाफिया या जागेवर डोळा ठेवून असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर हे प्रवेशद्वार बंद करण्याचा प्रयत्न झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेषत: महिला, ज्येष्ठ नागरिक आणि मजूर वर्गाला सकाळ-संध्याकाळी शौचालयाच्या वापरासाठी उघड्यावर किंवा रस्त्यालगत जाण्याची वेळ येत असल्याने आरोग्य व स्वच्छता व्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, या प्रकरणाबाबत अद्याप भुसावळ नगरपालिका प्रशासनाला अधिकृत माहिती नसल्याचे समजते. सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने संबंधित विभागाकडे कोणतीही तक्रार नोंदवली गेली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.
परिसरातील सुजाण नागरिकांनी बंद केलेली पत्रे तातडीने हटवून शौचालय पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी केली आहे. तसेच जागा बळकावण्याच्या उद्देशाने हा प्रकार घडला असल्यास संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आता नगरपालिका प्रशासन या प्रकाराकडे किती गांभीर्याने लक्ष देते आणि शौचालयाच्या जागेची सुरक्षितता कशी सुनिश्चित करते, याकडे भुसावळकरांचे लक्ष लागून आहे.


