भुसावळातील प्रभाग ११ ‘ब’ ची लढत मंत्री सावकारे, चाैधरी बंधुंसाठी ‘लाख माेलाची’ : भाजपतर्फे माजी नगरसेविका मेघा वाणी, राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे भावना पाटील यांच्यात लढत ;

भुसावळ (उज्वला बागुल ) – पालिकेच्या तीन जागांसाठी २० डिसेंबर राेजी मतदान हाेत आहे. त्यात प्रभाग क्रमांक ११ ‘ब’च्या लढतीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. इथे बहुरंगी लढत असली तरी भाजपच्या माजी नगरसेविका मेघा वाणी आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या भावना पाटील यांच्यात खरा सामना आहे. मंत्री संजय सावकारे आणि माजी आमदार संताेष चाैधरी, माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चाैधरी यांनी ही लढत प्रतिष्ठेची केली आहे. ५०पैकी ४७ जागा आणि नगराध्यक्ष पदासाठी मतदान झाल्याने सारेच निवांत झाले आहेत. त्यामुळे आता सर्वच मातब्बर नेत्यांनी आपली ताकद या प्रभागात लावली आहे. ‘न भूताे न भविष्यती’ अशी येथील लढत रंगली आहे. प्रचारासाठी अजुन दहा दिवस येथील उमेदवारांना मिळाले आहेत. त्यामुळे डाेअर टू डाेअर संपर्क साधण्याची संधी त्यांना लाभली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट आण अपक्ष उमेदवार कुणाच्या मतांची विभागणी करताे यावर इथले विजयाचे गणित अवलंबून आहे.

प्रभाग ११ ब : सर्वसाधारण महिला आरक्षण असलेल्या या जागेसाठी भाजप, राष्ट्रवादी शरद पवार गट, राष्ट्रवादी अजीत पवार गट व अपक्ष असे चार उमेदवार रिंगणात आहेत. अपक्ष व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार काय भूमिका घेतात? यावर निवडणुकीचे व निकालाचे स्वरूप ठरेल. लोकनियुक्त नगराध्यक्षपद व नगरसेवकांच्या ५० जागा आहेत. यापैकी तीन जागा नाट्यमय घडामोडी घडल्याने बिनविरोध झाल्या. तर तीन जागांवरील निवडणूक पुढे लोटली गेली. त्यामुळे २ डिसेंबरला नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या ४४ जागांसाठी मतदान झाले. आता प्रभाग क्र. ४ ब, ५ ब आणि ११ ब अशा तीन जागांसाठी २० डिसेंबरला मतदान होणार आहे.

राजकीय वचपा काढण्याची संधी

भुसावळच्या राजकारणात प्रभाग क्रमांक अकरामधील विठ्ठल मंदिर वाॅर्ड हा परिसर बिनीची भूमिका निभावताे. राजकारण पलटवण्याची क्षमता असलेले धुरंधर या प्रभागातून गतकाळात हाेऊन गेले आहेत. लाेकनियुक्त नगराध्यक्ष पद भूषवणारे रमण भाेळे यांच्या आधी माेठी घडामाेड पालिकेत झाली हाेती. तेव्हा राष्ट्रवादीकडून संताेष चाैधरी यांनी अख्तर पिंजारी यांना भाजपचे दाेन नगरसेवक फाेडून नगराध्यक्ष केले हाेते. तेव्हा भाजपचे जे दाेन नगरसेवक फुटले हाेते त्यात भावना अजय पाटील आणि आणखी एक नगरसेवक (तटस्थ) असे दाेन जण फुटले हाेते. भावना पाटील यांनी तर थेट राष्ट्रवादीला मतदान केले हाेते. तेव्हापासून त्या भाजपच्या निशाण्यावर आहेत. गेल्या निवडणुकीतही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला हाेता. मात्र, आता त्यांनी गेल्या तीन वर्षांपासून तयारी करून ठेवली आहे. त्यांचे पती अजय पाटील हे पायाला भिंगरी लावून मतदारसंघ पिंजून काढत आहेत. त्यांना तसा प्रतिसादही मिळताे आहे.

निवडणूक कार्यक्रम असा

१० डिसेंबर : दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी माघारीची मुदत ,११ डिसेंबर : उमेदवारांची अंतीम यादी प्रसिद्ध करण्यात येईल, २० डिसेंबर : सकाळी ७.३० ते ५.३० वाजेपर्यंत मतदान होईल – २१ डिसेंबर : सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी सुरू होईल.