वरणगावात स्ट्रॉंगरूम सुरक्षेवर संशय ; सीसीटिव्ही बंद, विज गुल ; उमेदवारांचे गंभीर आरोप

वरणगाव – नुकत्याच २ डिसेंबर रोजी आयोजित 5 जीपार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीनंतर ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेबाबत मोठा वाद उभा राहिला आहे. स्ट्रॉंग रूम परिसरातील सुरक्षेतील त्रुटींमुळे उमेदवार आणि नागरिकांमध्ये गंभीर संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, दिनांक २ रोजी रात्री सुमारे दीड वाजता नगरपरिषद कार्यालयातील लाईट अचानक बंद पडली. त्यानंतर आज सकाळी काही काळासाठी स्ट्रॉंग रूम परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरेही बंद झाल्याचे समोर आले. या दोन्ही घटना अत्यंत संशयास्पद असल्याचा आरोप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र विश्वनाथ चौधरी तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार समाधान महाजन, सौ. योगिता सोनार आणि इतर उमेदवारांनी केला आहे. उमेदवारांच्या म्हणण्यानुसार, ईव्हीएम मशीन मतमोजणी ज्या ठिकाणी ठेवली आहेत त्या ठिकाणी 24 तास अखंडित व कडेकोट सुरक्षा असणे आवश्यक आहे. मात्र, अचानक वीजपुरवठा खंडित होणे आणि सीडी सीसीटीव्ही यंत्रणा काही काळासाठी ठप्प होणे ही अत्यंत गंभीर बाब असून निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.या घटनांनंतर मोठ्या प्रमाणात नागरिकही नगरपरिषद कार्यालयात जमा झाले. लोकशाही प्रक्रियेवर कोणताही परिणाम होऊ नये, म्हणून प्रशासनाने तातडीने कठोर आणि सुनियोजित सुरक्षा व्यवस्था करावी, अशी मागणी उमेदवारांसह नागरिकांकडून जोर धरत आहे.

दरम्यान, संपूर्ण प्रकरणाची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली असून स्ट्रॉंग रूमची सुरक्षा वाढवण्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे. येऊ घातलेल्या मतमोजणीनंतर कोणतीही शंका किंवा गोंधळ राहू नये म्हणून या संशयास्पद घटनांचा सखोल तपास अपेक्षित असल्याचे उमेदवार आणि मतदारांनी सांगितले आहे.