भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ तालुक्यातील मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण झाल्यानंतर शनिवारी सायंकाळी सर्व ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन तहसिल कार्यालयातील स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षितपणे जमा करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार ही संपूर्ण प्रक्रिया काटेकोरपणे पार पडली.

स्ट्रॉंग रूमसमोर प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील, डीवायएसपी संदीप गावित, पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे, नगरपालिका मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांच्यासह अधिकारी सतत उपस्थित होते. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करत सर्व मशीन व्यवस्थित सील झाल्याची खात्री केली.
सुरक्षेसाठी परिसरात त्रिस्तरीय बंदोबस्त, सीसीटीव्ही कॅमेरे, तसेच पोलिस व होमगार्डची अतिरिक्त तैनाती करण्यात आली आहे. स्ट्रॉंग रूमकडे जाणाऱ्या मार्गांवर सुरक्षा नाकेबंदी असून अनधिकृत व्यक्तींना प्रवेशबंदी आहे. राजकीय पक्षांच्या उमेदवारांना नियमानुसार पाहणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिवसातून तीन वेळा सुरक्षा तपासणी केली जाणार आहे.
मतदान यंत्रणा सुरक्षित ठेवणे ही निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाची पायरी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्व मशीन सुस्थितीत असून मतमोजणी घोषित केलेल्या तारखेनुसार पार पडणार असून प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक राहील, असे प्रशासनाने स्पष्ट केले.


