भुसावळात अंतीम मतदार यादीतही घोळ : एकाच कुटूंबातील पती-पत्नींची नावे वेगवेगळ्या प्रभागात -हरकत घेवूनही प्रभाग 18 च्या यादीतच नाव कायम

भुसावळ (प्रतिनिधी ) : भुसावळ पालिका प्रशासनाने आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतीम मतदार यादी जाहिर केली आहे. या अंतीम मतदार यादीमध्येही अनेक घोळ असल्याची बाब समोर आली आहे. एकाच घरातील पती-पत्नीची नावेही वेगवेगळ्या प्रभागातील मतदार यादीत हरकत घेवूनही कायम आहेत. तर काही वार्डात अंतीम मतदार यादीनंतर मतदारांची संख्या वाढली आहे. ड. अभिजीत मेणे यांनी हरकत घेवूनही त्यांचे नाव प्रभाग 13 ऐवजी 18 च्या मतदार यादीत आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाकडेही तक्रार करण्यात आली आहे.

हरकत घेवूनही नावे कायम
शहरातील प्रभाग 13 मधील शिवाजी नगरातील महालक्ष्मी मंदिराजवळील रहिवासी अ‍ॅड.अभिजीत मेणे यांचा रहिवास आहे. त्यांच्या घरातील सहा कुटूंबीयांची नावे प्रभाग 18 मध्ये होते. प्रारुप मतदार यादीतील या नावांवर त्यांनी हरकती घेतल्या. या हरकतीनंतर कुटूंबातील पाच नावे प्रभाग 13 मध्ये वळवली मात्र त्यांचे नाव प्रभाग 18 मध्येच आहे. एकाच घरात राहणार्‍या पत्नीचे नाव प्रभाग 13 तर पतीचे नाव प्रभाग 18 मध्ये आहे. या प्रकरणी अ‍ॅड.मेणे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. यासोबतच पालिका प्रशासनाच्या कारभाराबद्दल त्यांनी संभाजीनगर उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल करण्याचा इशाराही अ‍ॅड.मेणे यांनी दिला आहे.

प्रभाग 24 मध्ये 912 मतदार वाढले
प्रभाग क्रमांक 24 च्या प्रारुप यादीत सात हजार 913 मतदार होते मात्र यानंतर जाहिर झालेल्या अंतीम यादीत आठ हजार 825 मतदार आहेत. नवीन अंतिम यादीत 912 मतदार वाढलेले आहेत. इतक्या जणांनी या प्रभागातून हरकती घेतल्या होत्या काय? असा सवाल शिशिर जावळे यांनी व्यक्त करीत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.