भुसावळ ( प्रतिनिधी) : भुसावळ शहर व तालुक्याच्या विकासात पालकमंत्र्यांचाही वाटा आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेला सन्मानजनक जागा मिळत असतील तरच युती होईल. असे मत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. येथील संतोषी माता हॉल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या (शिंदे गट) मेळाव्यात ते बोलत होते. तब्बल १६ वर्षांनंतर आयोजित करण्यात आलेल्या हा मेळावा उत्साहात पार पडला.
गुलाबराव पाटील पुढे म्हणाले पालकमंत्री म्हणून डीपीडीसीच्या माध्यमातून भुसावळ शहरासाठी ४९ कोटी रुपये दिले. शहरातील चकाचक रस्ते त्याचाच परिणाम आहे. जलजीवन मिशन साठी तालुक्यातील ग्रामीण भागाला ३० कोटी रुपये दिले. विकासात आमचाही सहभाग आहे.

भुसावळ पुन्हा शिवसेनेचा बालेकिल्ला करू
शिवसेनेला सन्मानजनक जागा मिळाल्या तरच युती होईल. आम्हाला नगण्य समजू नका. भुसावळ शिवसेनेचा बालेकिल्ला होता. पुन्हा तो बालेकिल्ला करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी. मित्र पक्षाला आमचे सांगणे आहे तुम्ही प्रेम द्या आम्ही प्रेम देऊ. मात्र आमच्या कडे दुर्लक्ष झाल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील. शिवसेना ही कार्यकर्त्यांच्या भरवशावर चालणारी संघटना आहे. उमेदवार निवडीसाठी कोअर कमिटी तयार करा. पक्के निवडुन येणारे, काठावरचे, मध्यम व निवडुन येण्याची शक्यता फारच कमी असलेले असे इच्छुक उमेदवारांचे वर्गिकरण करा. म्हणजे युती करताना वाटाघाटी करणे सोपे जाईल असे गुलाबराव पाटील म्हणाले.
जोरदार राजकीय शक्तिप्रदर्शन

आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे, समाधान महाजन आदींची भाषणे झाली. माजी नगरसेवक दीपक धांडे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. तर माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास जळगाव विभागाचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी महापौर विष्णू भंगाळे, जिल्हाप्रमुख समाधान महाजन, महिला जिल्हाप्रमुख नंदाताई निकम, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख पवन भोळे, ज्येष्ठ शिवसैनिक विलास मुळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष माळी, शहर प्रमुख पवन नाले, महिला तालुकाप्रमुख वर्षा तल्लारे, महिला शहर प्रमुख दीपाली बऱ्हाटे, श्रद्धा गायकवाड, सौ संगीता भामरे , उपतलुका प्रमुख जितेंद्र नागपुरे, सुरेश कोल्हे, गजानन पालोदे, वरणगाव शहर प्रमुख दुर्गेश बेदरकर, विलास वंजारी, अल्पसंख्याक आघाडीचे सैयद जाफर अली यांच्यासह शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक व युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेनेत इनकमिंग वाढू लागले
मेळाव्यात अनेक मान्यवरांनी शिवसेनेत प्रवेश करून भगव्या झेंड्याला सलामी दिली. त्यामध्ये गिरीश नेमाडे यांची पत्नी व शिंदी येथील सामाजिक कार्यकर्त्या नीलिमा नेमाडे, लेवा पाटील समाजाच्या सून व चर्मकार समाजाच्या कार्यकर्त्या रुपाली अमोल चौधरी (ठोसर), तत्कालीन नगरसेवक अमोल इंगळे, माजी नगराध्यक्ष माधुरी फालक, सामाजिक कार्यकर्ते हितेश तायडे, गणेश पाटील सर, मयूर बऱ्हाटे, उबाठा येथील कैलास जाधव, राहुल पवार, निळकंठ पवार, राहुल सोनवणे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व पालकमंत्री यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

ठळक वैशिष्ट्ये
माजी जिल्हाप्रमुख कै. राजेंद्र दायमा यांनी २००९ मध्ये याच संतोषी माता हॉलमध्ये घेतलेल्या शेवटच्या मेळाव्याची आठवण या कार्यक्रमात जागी झाली; जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले.
स्थानिक दिवंगत नेत्यांच्याही प्रतिमा
व्यासपीठालगत शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या सोबतच माजी जिल्हा प्रमुख कै राजेंद्र दायमा, माजी तालुकाप्रमुख कै. निळकंठ फालक यांच्याही प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या.


