येवला येथे खळबळ ; ध्वजारोहण प्रसंगी शेतकरी कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न –

येवला – नाशिक जिल्ह्यातील येवला येथील तहसील कार्यालय आवारात ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरू असतानाच तालुक्यातील पारेगाव येथील शेतकरी कुटुंबाने शेतातील शिव रस्ता खुला करावा या मागणीसाठी अंगावर डिझेल टाकत आत्मदहनाचा प्रयत्न केला.

शिवरस्ता फक्त कागदोपत्री खुला करण्यात आल्याचा आरोप करत संजय पाठे, विजय पाठे आणि सुलभा पाठे रा. पारेगाव या शेतकरी कुटुंबाने, शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेती करावी कशी असा प्रश्न उपस्थित केला. अनेक वेळा प्रयत्न करून देखील मार्ग निघत नसल्याने शेवटी आत्मदहन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे यावेळी शेतकरी कुटुंबाने सांगितले.
दरम्यान, शहर पोलीस निरीक्षक अनिल भवारी आणि तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक तातडीने हस्तक्षेप करत आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.सदर शिवरस्ता खुला करण्यात आल्याचे येवला तहसीलदार आबा महाजन यांनी सांगितले तर सदर घटनेनंतर तहसीलदार महाजन यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत त्वरित शिवरस्ता खुला करण्याच्या सूचना दिल्या

. येवला तालुक्याच्या इतिहासात प्रथमच स्वातंत्र्य दिना दिनी ध्वजारोहण प्रसंगी तहसील कार्यालय आवारात शेतकरी कुटुंबाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने प्रशासन मात्र खडबडून जागे झाले .