पर्यावरण दिनानिमित्त सिव्हील सोसायटीने केले वृक्षरोपण- सामाजिक व शैक्षणिक कार्यात अग्रेसर असलेल्या संस्थेचे होतेय कौतुक

वरणगाव । प्रतिनिधी

वरणगाव शहरातील जवाबदार नागरीकांनी एकत्र येऊन वरणगाव सिव्हिल सोसायटीची स्थापना केली असुन या सोसायटीच्या माध्यमातून शैक्षाणिक, क्रिडा, सांस्कृतिक, आरोग्य व पर्यावरण असे सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत . त्यापैकीच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सोसायटीच्या माध्यमातून वरणगाव शहरातील विविध भागात वृक्षारोपण करण्यात आल्याने या सोसायटीच्या कार्याचे कौतुक केले जात आहे .

वरणगाव सिव्हील सोसायटी ही एक अशी संस्था आहे, जी शहरातील जबाबदार अशा नागरिकांनी सन – २०१९ मध्ये एकत्र येऊन स्थापन केली आहे. सोसायटीच्या माध्यमातून एक नागरिक म्हणून शहराच्या प्रती आणि नागरी जीवनाच्या करिता जे काही करता येईल यासाठी पुढाकार घेतला जातो .शहरातील नागरिकांचे जगणे सुसह्य व्हावे आणि जीवनमान उंचावा यासाठी सोसायटीचे सदस्य करीत असतात .संस्थेच्या स्थापनेपासून पर्यावरण, शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक आणि आरोग्य अशा विविध क्षेत्रांमध्ये ही संस्था काम करत आहे. त्यापैकीच दरवर्षी वृक्ष संवर्धन करण्यासाठी सर्व सभासद सक्रिय असतात. त्याचबरोबर नागरिकांना वृक्षारोपणासाठी प्रेरितही केले जाते. गणेशोत्सव व नवरात्रौत्सव दरम्यान पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून सोसायटीच्या वतीने निर्माल्य संकलन केले करून त्यापासून खताची निर्मिती करणे, तसेच पर्यावरण पूरक गणेश मूर्ती स्थापना केल्या जाव्यात म्हणून मुला – मुलींसाठी कार्यशाळेचे आयोजन केले जाते . त्याचबरोबर यात्रा उत्सवांमध्ये मानवनिर्मित कचऱ्याची विल्हेवाट लावणे यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. तसेच क्रीडा प्रकारामध्ये दरवर्षी सोसायटीकडून भव्य अशी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले जाते. इतकेच नव्हे तर शहरामध्ये धार्मिक आणि जातीय सलोखा रहावा म्हणून प्रबोधन पर असे व्याख्यानांचे आयोजन सिव्हिल सोसायटी करीत असते . तसेच बाल लैंगिक शोषणासारख्या संवेदनशील मुद्द्यांवर सिव्हिल सोसायटीच्या महिलांनी खेडोपाड्यात जाऊन तेथील शाळांमध्ये ‘बॅड टच गुड टच’ यावर अतिशय महत्त्वपूर्ण असे कार्यक्रम सादर केले आहेत. त्यामुळे राजकीय किंवा प्रशासकीय मार्गांनी मिळणाऱ्या सुविधांपेक्षा ,नागरिकांनी त्यांची जबाबदारी ओळखून काय ? करता येईल ते त्यांनी केले पाहिजे हे भान ठेवून सिविल सोसायटीचे सदस्य काम करीत आहेत.

“माझे शहर माझी जबाबदारी”

माझे शहर माझी जबाबदारी हे ब्रीदवाक्य सार्थ ठरविण्यासाठी प्रत्येक सभासद प्रयत्नशील असुन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सोसायटीच्या सभासदांनी शहराच्या विविध भागात वृक्षरोपण केले . तसेच मागील वर्षी सुद्धा ६० वृक्षांची लागवड करून त्यांचे व्यवस्थीतरित्या संगोपन केल्याने आज रोजी ते डौलाने उभे आहेत . यासाठी शहरातील प्रख्यात डॉ . राहुल भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीचे सदस्य गोपाळ गावंडे, अक्षय भावसार, रामचंद्र पाटील, सदानंद जोशी, राजु गायकवाड, हेमंत पाटील, आर . एन . पाटील, डॉ . रविंद्र माळी, निलेश झोपे, सचिन बेलोकार, अनिल शिंदे सर, गोपाळ कळसकर आणि श्री . परसे परिश्रम घेत आहेत .