भुसावळातील तरुण गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतूसासह पोलिसांच्या ताब्यात;

भुसावळ (प्रतिनिधी ) : भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे एका तरुणाकडून दोन जिवंत काडतूस व पिस्टल जप्त केले आहे. ही कारवाई भुसावळ शहरातील आलिशान वॉटर पार्कच्या मागे असलेल्या वीट भट्ट्यांजवळ गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास करण्यात आली. निलेश अनंत पारधे (21, रा. छायादेवी राकानगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
भुसावळ शहरातील आलिशान वॉटर पार्क परिसरामधील वीटभट्टीजवळ संशयित आरोपी निलेश अनंत पारधे हा पिस्टल बाळगून असल्याची माहिती भुसावळ बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी गुरुवार, 29 मे रोजी दुपारी दीड वाजता कारवाई करत संशयित आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडून 15 हजार रुपये किंमतीचा कट्टा व दोन हजार रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतूस जप्त केले. पोलिस कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी निलेश पारधे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजू सांगळे, विजय नेरकर, महेश चौधरी, अमर आढाळे, राहुल वानखेडे व हर्षल महाजन आदींच्या पथकाने केली. तपास पोलिस उपनिरीक्षक राजू सांगळे करीत आहेत.