तीन हजार सहाशे रुपयांची लाच मागणी भोवली : निपाणेतील मुख्याध्यापक जळगाव एसीबीच्या जाळ्यात –

जळगाव : एरंडोल तालुक्यातील निपाणेतील श्री संत हरिहर माध्यमिक हायस्कूलच्या मुख्याध्यापकाला तीन हजार सहाशे रुपयांच्या लाच मागणी प्रकरणी जळगाव एसीबीने अटक केली आहे. या कारवाईने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे तक्रारदाराकडून यापूर्वीही लाच स्वीकारल्याप्रकरणी मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल होता हे विशेष !संदीप प्रभाकर महाजन (45) असे गुन्हा दाखल झालेल्या व अटकेतील मुख्याध्यापकाचे नाव आहे.

असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार हे निपाणे (ता. एरंडोल) येथील संत हरिहर महाराज माध्यमिक शाळेत शिपाई आहेत तर संदीप महाजन याच शाळेत मुख्याध्यापक आहेत. तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीचे 23 हजार 815 रुपयाचे मेडिकल मंजूर होण्याकामी मुख्याध्यापक महाजन यांच्याकडे सादर केले होते. हे मेडिकल बिल स्वतःचे वैयक्तिक ओळखीने सिव्हिल हॉस्पिटल, जळगाव व वेतन अधीक्षक माध्यमिक शिक्षण विभाग, जळगाव यांच्याकडे प्रस्ताव सादर करून मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात मुख्याध्यापक महाजन यांनी तक्रारदाराकडे पाच हजार लाच मागितली होती.

याबाबत तक्रारदार यांनी 21 डिसेंबर 2024 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दिली होती. तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता मुख्याध्यापक महाजन यांनी तक्रारदार यांच्या पत्नीचे 23 हजार 815 रुपयांचे मेडिकल बिल मंजूर करून आणून देण्याच्या मोबदल्यात तडजोडी अंती सदर मेडिकल बिलाच्या एकूण रकमेच्या 15 टक्के प्रमाणे तीन हजार सहाशे रुपयांची लाचेची मागणी करून सदर ती मिळविण्याचा प्रयत्न केल्याने मुख्याध्यापक संदीप महाजन यांच्याविरुद्ध कासोदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान मुख्याध्यापक संदीप महाजन यांनी या अगोदर तक्रारदार शिपाई यांच्याकडून वेतन निश्चितीच्या फरकाचे दोन लाख 53 हजार 780 रुपयांच्या फरकाचे पाच टक्के प्रमाणे 12 हजार 500 रुपये मागून तक्रारदाराकडून दहा हजारांची लाच रक्कम स्वीकारली होती. मुख्याध्यापक संदीप महाजन यांच्याविरोधात त्यावेळी 27 जून 2024 रोजी कासोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, एएसआय सुरेश पाटील, किशोर महाजन, बाळू मराठे, प्रदीप पोळ आदींच्या पथकाने ही कारवाई केली.